मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:10 PM2018-03-23T12:10:17+5:302018-03-23T12:10:17+5:30

मुंबई विद्यापीठात 25 मार्चला होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि युवासेना यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Shiv Sena's heavy preparations for the Senate elections in Mumbai University | मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी 

मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी 

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई -  मुंबई विद्यापीठात 25 मार्चला होणाऱ्या सिनेटच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि युवासेना यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. युवासेनेचे कडवे आव्हान भाजपाप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस प्रणित एनएसयुआय यांच्या उमेदवारांसमोर आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 2010 साली झालेल्या या निवडणुकीत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठावर भगवा फडकवून इतिहास रचला होता. तर अलिकडेच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत युवासेनेने अभिविपीला धूळ चाळली होती.

2010 च्या सिनेटच्या निवडणुकीत जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्नदेखील मार्गी लावले होते. वेळप्रसंगी विद्यापीठावर धडक देऊन अनेक आंदोलनेदेखील छेडली होती. तर अनेकवेळा राज्यपालांचीदेखील भेट घेतली होती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते व शिवसेना विधानपरिषदेचे गटनेते अॅड.अनिल परब यांनी अभिमानाने सांगितले.
या निवडणुकीसाठी पदवीधरांमधून होणाऱ्या 10 जागांसाठी  शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून जावेत म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे मुंबईतील 12 विभागातील सर्व आमदार, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवासेना विभागाधिकारी  ते गटप्रमुखांपर्यंत सर्वच जोरदार कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने या निवडणुकीच्या तयारीसाठी आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शिवसेना विभागक्रमांक 4 व 5 ची एक महत्त्वाची बैठक जुहू येथील ऋतंबरा कॉलेजच्या हॉलमध्ये घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदवीधर मतदारांना करण्यात येणाऱ्या आवाहनासंबंधीचे मार्गदर्शन झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांमधील मतदारांना मतदार केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे  कसब जागृत करण्याचे आवाहन केले. तर अॅड.अनिल परब यांनी आपल्या भाषणात पदाधिकाऱ्यांना येत्या रविवारी रामनवमी असल्याकारणाने प्रथम मतदान घडवून आणण्याचे कर्तव्य पार पाडावे व नंतर रामनवमी उत्सवाच्या तयारीस लागावे असे सांगितले. 

या बैठकीनंतर उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी आपापल्या विभागात पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र दिसत आहे. त्या निमित्ताने उपविभागप्रमुख राजेश शेट्ये व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे यांनी वर्सोवा विधानसभेअंतर्गत शाखांमध्ये बैठका घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विभागातून जास्तीतजास्त मतदान घडवून आणण्यासाठी जोर लावला आहे,तर सोशल मीडियावरून देखील या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: Shiv Sena's heavy preparations for the Senate elections in Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.