Join us  

संभाजीराजेंसाठी मराठा संघटनांचे प्रतिनिधी राऊतांना भेटले, पण शिवसेना पक्षप्रवेशावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 7:24 AM

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली

मुंबई : ‘संभाजीराजे छत्रपती यांनी आधी शिवसेनेत यावे, तरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, या अटीवर शिवसेना कायम असल्याने आणि त्याचवेळी अपक्ष लढण्याची भूमिका संभाजीराजे यांनी घेतल्याने, शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याबाबतचा पेच कायम आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यात मुख्यत्वे राज्यसभा निवडणुकीचा विषय होता. शिवसेना जी एक जागा हमखास जिंकणार आहे त्यासाठी राऊत यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तथापि, आणखी एक जागादेखील शिवसेना लढेल, असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना दोन जागा लढवेल, हे नक्की. आम्ही ही जागा निश्चितपणे जिंकू. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा मागितला. शिवसेनेत येणार असाल तर उमेदवारीचा नक्कीच विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. ते आमचेच आहेत, कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. ही दुसरी जागा शिवसेनेची आहे आणि त्यावर शिवसेनेचाच उमेदवार राहील, असे सांगत राऊत यांनी संभाजीराजे यांचे टेन्शन वाढविले.

मराठा संघटनांचे प्रतिनिधी भेटले

मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी सकाळी राऊत यांची भेट घेऊन शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. एकूण सामाजिक विषयात संभाजीराजे यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते केवळ वारसदारच नाहीत तर त्यांच्या विचारांचा वसाही त्यांनी पुढे चालविला आहे. हे लक्षात घेता शिवसेनेने त्यांना पाठिंबा द्यावा, असे साकडे पदाधिकाऱ्यांनी घातले.

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेससंभाजी राजे छत्रपती