Join us  

शिवसेनेचा भाजपाला धक्का; पालघर पोटनिवडणूक लढवणार, दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलालाच तिकीट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 12:19 PM

शिवसेना आणि भाजपा पालघरमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता

मुंबई: भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिंतामण वनगा यांची पत्नी जयश्री, मुलगा श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं श्रीनिवास यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानं आता भाजप नेमकी काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचं 30 जानेवारी 2018 रोजी निधन झालं. 'पालघर जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी चिंतामण वनगा यांनी 35 वर्षे काम केलं. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षानं आम्हाला वाऱ्यावर सोडलं,' असं चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री यांनी शिवसेनेत प्रवेश करताना म्हटलं. चिंतामण यांचा मुलगा श्रीनिवास पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्सुक आहे. मात्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना भाजपाकडून उमेदवारी देणार दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर वनगा कुटुंबानं गेल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १० मे आहे. येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार ३ मे पासून यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांमध्ये उमेदवारांनी चार अर्ज घेतले. परंतु एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.

टॅग्स :शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसराजकारण