Join us  

…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 7:07 AM

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार?

ठळक मुद्देविरोधकांनी सतत विरोधी भूमिका घेतली तर त्याला अंतर्विरोध म्हणावा लागेल.विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षणदेवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून रुळावर येताना दिसत आहे

मुंबई - मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल असा चिमटा सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काढला आहे.

तसेच चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे. सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • सध्या पावसाची रिपरिप सुरूच असते तशी बातम्यांची रिपरिप सुरू आहे. रिपरिप म्हणजे फक्त शिडकावा, वादळ वगैरे नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे.
  • सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळय़ा रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही.
  • शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यास जर कोणी ‘शिष्टाई’, ‘मध्यस्थी’ वगैरे शब्दांचे अलंकार लावीत असतील तर ते अलंकार त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत.
  • मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे एक धाडसी, कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यामुळे रिपरिप बातम्यांच्या माध्यमांतून त्यांच्यावर नाहक टीका करण्याचे कारण नाही. विरोधक तसे करीत असतील तर ते क्षुद्र पातळीचे राजकारण ठरेल.
  • त्यातल्या त्यात आनंदाची बाब अशी की, देवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून रुळावर येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारले हे बरे झाले.
  • आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आणि हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधातूनच पडेल, असे विरोधी पक्षनेते सांगतात. विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, सरकार पाडण्याची घाई नाही, पण सरकार अंतर्गत विरोधातून पडेल असा गोंधळी विचार त्यांनी मांडला आहे.
  • देशात व राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. चीनने तात्पुरती माघार घेतली असली तरी कोरोनाची पीछेहाट झालेली नाही. कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये.
  • विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे व त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये.
  • चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे व फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा. विरोधी पक्षनेत्यांनी संकट काळात सरकारला विधायक सूचना कराव्यात.
  • कुठे त्रुटी दिसत असतील तर त्या दुरुस्त करून लोकांना सेवासुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घ्यावा, पण सरकार कोरोनासंदर्भात जे अचाट काम करीत आहे, त्या कामातली फक्त छिद्रे शोधण्याच्या मोहिमा राबवू नयेत. रोज तेच ते रडगाणे गायचे व कोरोनासंदर्भातील कामावर टीका करायची. यामुळे वैद्यकीय यंत्रणेचे मनोबल घसरते.
  • कधीकाळी राज्यकर्ते असलेल्यांना हे समजायला हवे. श्री. राहुल गांधी सैन्यदलाचे मनोधैर्य खच्ची करत असल्याचा आरोप भाजपचे दिल्लीतील नेते करीत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य व कोरोना सैनिकांच्या बाबतीत विरोधी पक्षाने तेच करू नये. महाराष्ट्र सुरक्षित राखण्याबाबत विरोधकांनी सतत विरोधी भूमिका घेतली तर त्याला अंतर्विरोध म्हणावा लागेल.
टॅग्स :शिवसेनादेवेंद्र फडणवीसशरद पवारभाजपाकाँग्रेस