Join us  

“वीर सावरकर आमचे आदर्श, त्यांच्याबद्दलची शिवसेनेची भूमिका आजही कायम”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 2:01 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वीर सावरकरांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर एका पुस्तक प्रकाशनावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वीर सावरकरांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श असल्याचे ते म्हणाले. 

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, वीर सावरकरांबद्दल शिवसेनेची कायम तीच भूमिका राहिली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. मोहन भागवत आणि संघाला सावरकरांविषयी प्रेम आले आहे. त्याचेही आम्ही स्वागत करतो, असे सांगत राजकारण, तुरुंगवासात असताना काहीवेळा रणनीती ठरवावी लागते. दहावर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येऊन कार्य करावे, असे वाटते. अशा परिस्थितीत जगभरात तुरुंगाबाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत, तो मार्ग अवलंबला. म्हणून त्याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही, असे राऊत यांनी नमूद केले. 

एकतेच्या विरोधात असलेल्यांना सावरकर आवडत नाही 

आजही देशात वीर सावरकरांविषयी माहितीचा मोठा अभाव आहे. समाजात वीर सावरकरांविषयी चुकीची माहिती आहे. जे लोक देशाच्या एकतेविरोधात आहेत, त्यांना सावरकर आवडत नाहीत. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती, असे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. 

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरसंजय राऊत