Join us  

“संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल, पण...”; संजय राऊतांचे सूचक संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:57 PM

Sanjay Raut on Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभेत शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी सूचक संकेत दिले आहेत.

मुंबई: राज्यसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेले संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मागितला. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवू, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे या चर्चेला बळ मिळाले असताना संजय राऊतांनी त्यावर खुलासा करताना राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी सहा सदस्यांची टर्म संपून त्या जागी नव्या सदस्यांची निवड केली जाते. यानुसार संभाजीराजे छत्रपती यांची देखील टर्म संपत असून त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल

शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा, असे संजय राऊत म्हणाले. आपल्याला सहावा उमेदवार म्हणून लढायचे असेल तर शिवसेनेत येऊन लढा, अशी अट मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती आहे. संभाजीराजे यांनी आधीच अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रवादीतच एकमत नाही!

शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते त्यांना देण्याचे संकेत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप तसा निर्णय झालेला नाही. आमच्याकडील अतिरिक्त मते शिवसेनेला दिली जातील, असे सूचित केले. पवार यांनी पत्रकारांना सांगितले की दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या तेव्हा सेनेने अतिरिक्त मते आम्हाला दिलेली होती. त्यामुळे पुढील वेळी आम्ही त्यांना अतिरिक्त मते देण्याचा ‘शब्द’ दिला होता.

दरम्यान, भाजपचाही संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एकूणच राज्यसभा निवडणुकीबाबतचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतात. यावेळीही तेच निर्णय घेतील. 

टॅग्स :संजय राऊतसंभाजी राजे छत्रपतीशिवसेनाउद्धव ठाकरे