Join us  

“युपीएचं सोडा, एनडीए तरी अस्तित्वात कुठे आहे?”; संजय राऊतांचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 1:54 PM

राहुल गांधींचे माहिती नाही. पण कोरोनामुळे पंतप्रधान परदेशात नाहीत इतकेच, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. यावेळी युपीएचे अस्तित्व कुठे आहे, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीएचे अस्तित्व तरी कुठे आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

ममतांनी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसवर टीका केली. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे. पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखे परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, अशी खोचक विचारणा करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 

एनडीए तरी अस्तित्वात कुठे आहे

जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे, असा रोखठोक सवाल करत शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे हे सत्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये

राहुल गांधी परदेशात आहेत की नाही माहिती नाही. फक्त कोरोनामुळे पंतप्रधान परदेशात नाहीत इतकंच आहे. ते सुद्दा परदेशात असतात. त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधताना काँग्रेसच्या कमकुवतपणावर बोट ठेवले. भाजपला समर्थ पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समविचारी शक्ती एकत्र आल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा निर्वाळाही ममता बॅनर्जी यांनी दिला. त्यासाठी जेथे ज्या पक्षांची ताकद आहे, त्यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठीच भेट दिल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले. 

टॅग्स :संजय राऊतममता बॅनर्जीभाजपा