Join us  

Constitution Day: “देशाची घटना पायदळी तुडवली जातेय, संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?”; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 1:51 PM

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ असून, विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन (constitution day) साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्र सरकारने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मोदी सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामध्ये शिवसेनेचाही समावेश होता. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, एकीकडे देशाची घटना पायदळी तुडवली जात असताना दुसरीकडे संविधान दिन साजरे करण्याचे नाटक कशासाठी केले जात आहे, अशी विचारणा केली. 

विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. देशात दररोज संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशात संविधानाचे राज्य राहिलेले नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमे, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचे नाटक कशासाठी, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ 

भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालावा, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते, ते महत्त्वाचे आहेत. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. गेल्या काही वर्षांपासून दरररोज पायाखाली तुडवला जात असून, अवहेलना केली जात आहे. त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचे जे ठरवले आहे, त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले 

एसटी संपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले आहेत. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत. कामगार आता कामावर येण्याच्या मनस्थिती आहेत. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहेत. कामगरांनी कामावर जाण्यातच त्यांचे हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संविधान दिनसंजय राऊतकेंद्र सरकार