Join us

Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले; आमदार निवासातील रुमच्या छताचा भाग कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:21 IST

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवसेनेला हा मोठाच धक्का होता. अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आपल्या एका डायलॉगने जगप्रसिद्ध झाले. मात्र, आकाशवाणी आमदार निवासमध्ये पाटील राहत असलेल्या रुममधील छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली असून, शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे.  रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचे काही समोर आलेल्या फोटोंमधून दिसून आले आहे. मुंबईतील या घटनेनंतर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. पण ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती आहे.

सुदैवाने घटनेतून थोडक्यात वाचले

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समदं', या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले. सुदैवाने बुधवारी ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेनंतर त्यांच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत. ही घटना मोठी होती, हे फोटोवरून दिसून येत आहे. 

दरम्यान, सांगोल्यात परतल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना बंडखोरी का केली, हे सांगताना, उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेली चौकडी, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळमुंबई