Join us  

Eknath Khadse: शिवसेना आमदाराचा अप्रत्यक्षपणे खडसेंना इशारा; मुक्ताईनगरच्या विकासात अडचणी आणल्यास...

By मुकेश चव्हाण | Published: October 21, 2020 6:58 PM

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुक्ताईनगरचे शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, गेली तीन साडे तीन दशके भाजपामध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवलं आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच एकनाथ खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठीराखे असलेले नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी तुम्हाला काय देणार?; एकनाथ खडसेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...

अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुक्ताईनगरचे शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

टीव्ही ९च्या वृत्तानूसार, चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे निष्ठावंत नेते नाहीत. पुढे पाहा काय काय होतंय. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर मी खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा मी लाडका आमदार आहे. त्याच्यामुळे मला काही त्रास होईल असं मला वाटलेलं नाही आणि वाटणार नाही.

Eknath Khadse: राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत गेल्यानं मी निःशब्द, भाजपची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे तुमच्या मतदारसंघाच हस्तक्षेप करतील का, या प्रश्नावर चंद्रकात पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंचा तो नैसर्गिक स्वभाव आहे.  ते कुठेही हस्तक्षेप करु शकतात. परंतु एकनाथ खडसे हा काही विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही. माझ्यासाठी मुक्ताईनगरचा विकास महत्वाचा आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास करताना महाविकास आघाडीत कोणत्याही नेत्यांनी अडचणी आणल्यास तर मी वरिष्ठांशी बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच असं न झाल्यास मग चंद्रकांत पाटीलच्या स्वत:ची स्टाईल जाणतो. त्याप्रमाणे भविष्यातील राजकारण होईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या मोठ्या निर्णयानंतर रक्षा खडसेंनीही भाजपाबाबत केली भूमिका स्पष्ट, म्हणाल्या...

कधी होणार पक्ष प्रवेश?

मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. 

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया

खडसेंची राजकीय कारकीर्द

एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतु मुंडे यांच्या निधनानंतर खडसेंना प्रदेश भाजपामध्ये डावलण्यात आल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. 

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या...

टॅग्स :एकनाथ खडसेमुक्ताईनगरशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीउद्धव ठाकरे