Devendra Fadnavis's reaction to Eknath Khadse's resignation in one sentence | Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर फडणवीसांची थोडक्यात प्रतिक्रिया

ठळक मुद्देखडसेंनी भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती मला मिळाली नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपली प्रतिक्रिया देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं

मुंबई - गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हाही त्यांच्याच सांगण्यावरुन नोंदविण्यात आल्याचा गौप्यस्फोटही खडेसंनी केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सावध भूमकिा घेतल्याचे दिसून आले. 

'पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत काम सुरू'

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वृत्त आल्यानंतर खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस काय बोलणार याची सर्वांना उत्कंठा होता. मात्र, फडणवीस यांनी याबाबत अधिकृत माहिती नसल्याचं म्हटलंय. 

Eknath Khadse: राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत गेल्यानं मी निःशब्द, भाजपची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा पाहणी दौऱ्यावर असून पत्रकारांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल त्यांना विचारले होते. त्यावर बोलताना, खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती मला मिळाली नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपली प्रतिक्रिया देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच, मला अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी यासंदर्भात बोलेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं. 

दिल्या घरी सुखी राहावं

राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावासाहेब दानवेंनी म्हटले आहे. 

एकनाथ खडसेंनी भाजपाला दिला २ ओळींचा राजीनामा; राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय. 

भापाकडून खडसेंना शुभेच्छा

केशव उपाध्ये म्हणाले की, कोणताही नेता अथवा कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, प्रदेशाध्यक्ष सातत्याने एकनाथ खडसेंच्या संपर्कात होते, संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु एकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं.

२ ओळींचा राजीनामा

अलीकडच्या काळात डावललं जात असल्याने एकनाथ खडसेंना भाजपाला सोडचिठ्ठी घेण्याचा निर्णय घेतला, गेली ४० वर्ष भाजपाच्या वाटचालीत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं योगदान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर एकनाथ खडसेंनी उघडपणे भाष्य करत नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना एकनाथ खडसेंनी अवघ्या २ ओळी लिहिल्या आहेत, त्यात म्हटलंय की, मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आलं आहे.

खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू

गेली ४० वर्षे मी भाजपाला वाढवण्याचं काम केलं. पक्ष घराघरात नेण्यासाठी कष्ट घेतले. पक्षानं मला अनेक पदं दिली हे मी कधीही नाकारणार नाही. पण मी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझी पक्षावर नाराजी नाही. केवळ एका व्यक्तीवर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री असावा असं मत मी व्यक्त केलं होतं. त्यानंतर माझ्यासोबत जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं असं सांगत एकनाथ खडसेंना भावना अनावर झाल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis's reaction to Eknath Khadse's resignation in one sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.