Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान सहा दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी घरी पोहोचला. १६ जानेवारी रोजी एका बांगलादेशी घुसखोराने सैफच्या वांद्रे येथील घरावर हल्ला केला होता. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेत्याची पत्नी करीना कपूर खान आणि मुलगी सारा त्याला घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. यावेळी सैफच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. घरी पोहोचताच सैफने हात उंचावून सर्वांचे आभार मानले. मात्र आता सैफ रुग्णालयातून घरी परतल्यानंतर शिंदे गटाने शंका उपस्थित केली.
फक्त पाच दिवसात सैफ बरा कसा झाला असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर सैफ एकदम फिट दिसत होता. मात्र, त्याच्या हातावर व मानेवर पट्टी बांधण्यात आली होती. सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सैफला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, मग तो इतक्या लवकर कसा फिट झाला असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
"सैफ अली खानच्या पाठीत २.५ इंच खोलवर चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बहुधा आत अडकला होता. सलग ६ तास शस्त्रक्रिया सुरू होती. हा सर्व प्रकार १६ जानेवारी रोजी घडला. त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतका फिट? अवघ्या ५ दिवसात? अद्भुत!" असं संजय निरुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. निरुपम यांनी सैफचा घरी जात असल्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
सैफ अली खानशी संबंधित मुद्द्यावर बोलताना संजय निरुपम यांनी म्हटलं की, सैफने निरोगी राहावे अशी आमची इच्छा आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा संपूर्ण मुंबईवर प्रश्न निर्माण झाला. सरकारवर प्रश्न उपस्थित केले गेले पण जेव्हा तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला तेव्हा काही प्रश्न आमच्या मनात आले.
"त्याच्या शरीरात २.५ इंची चाकू घुसला. ऑपरेशन झाले पण सैफ उडी मारत हॉस्पिटलमधून बाहेर आला. चार दिवसात कोणी बरे होऊ शकते का? सैफ रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचल्याचे रुग्णालयाने सांगितले. सैफचे ते सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? लहान मुलाला त्याच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेता येईल का?, असंही निरुपम यांनी म्हटलं.
दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अभिनेता सैफ अली खानची सध्या पूर्णपणे प्रकृती ठीक नाही आणि त्याला बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. अभिनेत्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर त्याच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.