Join us  

आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; सरनाईकांच्या विनंतीवर ईडीने घेतला महत्वाचा निर्णय

By मुकेश चव्हाण | Published: November 26, 2020 10:56 AM

मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली.

मुंबई: शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मंगळवारपासून ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारणा ढवळून निघाले आहे. ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सध्या क्वारंटाईन असल्यामुळे पुढच्या आठवड्यात चौकशी करावी, अशी विनंती ईडीकडे केली होती. प्रताप सरनाईकांच्या या विनंतीनंतर 'क्वारंटाईन झाल्यानंतर हजर राहा', असा आदेश प्रताप सरनाईकांना ईडीकडून देण्यात आला आहे. 

सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारंटाईन आहे. त्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. 

तत्पूर्वी, ईडीच्या चौकशीनंतरही प्रताप सरनाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. ईडीनं धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही. फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं, होतं. ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली, त्याच दिवशी उद्या काय होणार याचा विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत प्रताप सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व प्रताप सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; संजय राऊत आक्रमक

कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे. 

टॅग्स :प्रताप सरनाईकशिवसेनाअंमलबजावणी संचालनालयमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस