Join us

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 13:12 IST

काही दिवसांपूर्वीच नितीन नांदगावकर यांनी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णाला दिलेल्या अवाजवी बिलाविरोधात आंदोलन केले होते.  

मुंबई – आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नितीन नांदगावकरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेचे डॅशिंग नेते आणि सोशल मीडियात प्रसिद्ध असणारा चेहरा म्हणून नितीन नांदगावकर यांची ओळख आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णाला दिलेल्या अवाजवी बिलाविरोधात आंदोलन केले होते.  

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नितीन नांदगावकर यांना अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची तक्रार त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी मी शिवसेनेच्यावतीने हिरानंदानी रुग्णालयात जाऊन रिक्षाचालक कोरोना रुग्णाला दिलेले बिल कमी करण्याबाबत तसेच मृतदेह ताब्यात देण्याबाबत जाब विचारला होता. तेव्हा माझा तेथील सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी मला दम देऊन आठ लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितले होते.  

त्यानंतर मी सदर रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यावेळी माझी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाली होती. दरम्यान सोमवारी सकाळी मला मोबाइलवर धमकी देणारा फोन आला. तसेच मला शिविगाळ करण्यात आली, असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईशिवसेना