Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी...'; शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:51 IST

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

राज ठाकरेंच्या या ट्विटनंतर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मस्जिदच नव्हे तर मंदिरावरीलही अनधिकृत भोंगे योगी यांनी उतरवले आहेत, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, 35,221 ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल 10,923 लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते. 

टॅग्स :राज ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेयोगी आदित्यनाथ