Join us
Daily Top 2Weekly Top 5

बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर पंतप्रधान मोदींना फोन करणार का?; शिवसेनेचा मनसेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:01 IST

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं नाव घेत नाही. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी बुधवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना इशारा दिला होता. 

बृजभूषण सिंह आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी बृजभूषण सिंह मुंबईत येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र  हिंदू असूनही हिंदूंना विरोध करणाऱ्या सुपारीबाज बृजभूषण यांनी शिवरायांच्या पवित्र मातीवर पाऊल ठेवून दाखवावे, त्यांची तंगडी हातात दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला. 

वैभव खेडकर यांनी इशारा दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी निशाणा साधला आहे. अयोध्या दौरा रद्द झाला म्हणून बृजभूषण यांना आव्हान देताय का? तिकडे जावं लागणार नाही, म्हणून इथुनच बोलणार का? मुद्दा मार्गी न लावण्याची परंपरा कायम ठेवली, मग काय कारण शोधणार का? बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर मोदींना फोन करणार का? शरद पवार विनंती करा, बघा मार्ग सापडतोय का, असं दीपाली सय्यद यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, असं स्पष्टीकरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिलं होतं. 

रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

टॅग्स :दीपाली सय्यदवैभव खेडेकरमनसेशिवसेनाराज ठाकरे