Join us  

सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 2:12 PM

राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे.

मुंबई/ पुणे : राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत. तसेच आगामी २१ मे रोजी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत देखील नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवारी २१ मेला डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसेकडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.  

राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. सभा करायच्याच असतील तर आयोध्यामध्ये करून दाखवा... पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून, असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पुण्यात मनसेची पक्षसंघटना मजबूत आहे. मात्र गेल्या महिन्यात भोंग्याच्या भूमिकेबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढल्यानंतर पुण्यामध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळतेय. त्यावर या दौऱ्यामध्ये पडदा पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील निवडणुका यासंदर्भात देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच यानिमित्ताने महत्त्वाची पत्रकार परिषद देखील पार पडण्याची शक्यता आहे.

वसंत मोरेंना भेटीसाठी थेट फोन करून बोलावलं-

भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. भोंग्याच्या आंदोलनातही मोरे सहभागी नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले. पुण्यात रविवारी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मनसे कोअर कमिटीच्या पदाधिकार्यांसहित मेळावा आयोजित केला होता. त्या कोअर कमिटीच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून डावललं जातंय असं मोरे म्हणाले होते. उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं आहे, या रविवारी झालेल्या मेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.   

टॅग्स :राज ठाकरेदीपाली सय्यदमनसेशिवसेनापुणे