Join us  

“मातोश्रीवर वेळेवर खोके येत नाहीत म्हणून रश्मी वहिनींना..,” दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 12:35 PM

गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत, दीपाली सय्यद यांचं वक्तव्य.

काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, आता दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे आणि ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.

एकनाथ शिंदे माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारायला तयार आहे. ते काय जबाबदारी देतील याची मला कल्पना आहे, त्यासाठी मी तयार आहे,” असं दीपाली सय्यद म्हणाल्या. संजय राऊतांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापाचीच शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ते आहेत. हळहळू गोष्टी घडत गेल्या त्यामुळे दोन गट झालेत. शिंदेंनी मला शिवसेनेत आणलंय त्यामुळे त्यांच्यासोबत उभं राहणं आपलं कर्तव्य असल्याचं त्या म्हणाल्या.

“महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :दीपाली सय्यदशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे