Join us  

शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यातलं मांजर, मनसेची बोचरी टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:24 AM

Sandeep Deshpande: सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झालेली आहे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मुंबई - एकीकडे राज ठाकरे यांनी पक्ष विस्तारासाठी विदर्भ दौरा सुरू केला असताना मनसेच्या नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका सुरू आहे. सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झालेली आहे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच मनसेवर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवतोय, त्यावर जयंत पाटील यांनी बोलावं, असा टोला त्यांनी लगावला.

संदीप देशपांडे शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणताहेत. आधी स्वत: काय आहात ते पाहा. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातील मांजर झालेली आहे. ठाकरेंनी कितीही मेळावे घेतले तरी विचार आहे का तुमच्याकडे, असा सवालही त्यांनी शिवसेना नेतृत्वाला विचारला आहे.

यावेळी संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या औरंगाबादमधील नेतृत्वाचाही समाचार घेतला. शिवसेनेचे औरंगाबादमधील नेतृत्व हे आऊटडेटेड झालेलं आहे. दानवे असतील वा खैरे असतील, तेथील नेते हे आऊटडेटेड झालेले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर केली.

तसेच मनसेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतेय त्याचं काय, त्याबाबत जयंत पाटील काय बोलणार आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. 

टॅग्स :संदीप देशपांडेशिवसेनाशरद पवारमनसे