Uddhav Thackeray News: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, विरोधी पक्षनेतेपदाची रिक्त असलेली जागा, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मीरा रोड येथे झालेला मराठी मोर्चा, संजय गायकवाड यांचे कर्माचाऱ्याला मारहाण प्रकरण, त्रिभाषा सूत्रासाठी स्थापन करण्यात आलेली डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती असे अनेक मुद्देही विरोधक लावून धरत आहेत. यातच मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि शिवसेना पाठीशी उभी असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमचे कौतुक करण्यासाठी आलो आहे. तुम्ही एकजुटीने इथे जमला आहात. शिवसेना पूर्ण ताकदीने तुम्ही हा लढा जिंकेपर्यंत तुमच्या पाठिशी आहे, हे वचन द्यायला आलो आहे. विजयी मेळाव्याला मी पुन्हा येईन. पुन्हा येईन आता खरेतर फार बदनाम झाले आहे. पण मी नक्की येईन विजय उत्सव आपण एकत्र साजरा करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
आपली एकजूट करून यांना धडा शिकवू
तुमच्या हक्काच्या गोष्टी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आपण नेहमी असे म्हणतो की, पितृ देवो भव, मातृ देवो भव, गुरु देवो भव. पण सत्ताधारी फक्त दिल्लीश्वर जे सांगतात ते ऐकतात. तोच त्यांचा गुरु आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय चालला आहे. महाराष्ट्रात भूमिपूत्र, मराठी माणूस यांना चिरडून टाकण्याचा विडा दिल्लीच्या गुलामांनी घेतला आहे. आपण आपली एकजूट करुन यांना असा धडा शिकवू की, हे वळवळ करायला शिल्लक राहणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
दरम्यान, शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणे हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. शिक्षकांनी काही चिंता करू नये. एका दिवसाच्या आत तुमची मागणी मार्गी लावतो, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी खासदार नीलेश लंके यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते.