Join us  

Shiv Sena: आदित्य ठाकरेंच्या वरळीत एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला दे धक्का, शेकडो शिवसैनिक शिंदे गटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 2:59 PM

Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये शिंदे गटाने शिवसेनेला खिंडार पाडले आहे.

मुंबई -  दोन-तीन दिवसांवर आलेल्या दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट आमने सामने आलेले आहे. दोन्ही गटांकडून आपला मेळावा जोरदार व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये शिंदे गटाने शिवसेनेला खिंडार पाडले असून, वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. अनेक आमदार-खासदारांसह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटामध्ये दाखल झाले होते. शिवसेनेला लागलेली ही गळती अद्याप थांबलेली नाही. त्यातच दसरा मेळाव्या दिवशी शिंदेगटामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवली होती. तसेच हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा परिस्थितीत या बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांमध्ये फुटाफूट होणे हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी धक्कादायक मानले जात आहे. त्यातच दसरा मेळावा तोंडावर असताना हा पक्षप्रवेश झालेला असल्याने ही बाब शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी मानली जात आहे.  

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेआदित्य ठाकरेवरळी