Join us  

'... पण शिवसेनेला हात लावायचा नाही, असं ठरलंय फोडाफोडीचं राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 2:39 PM

प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळात भाजप-सेना युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेनंही कडक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही भाजपचीच चाल आहे. त्यामुळे, सरनाईक यांच्या पत्रावरुन महाविकास आघाडीत चुकीचा संदेश जाऊ नये, असे मुश्रिफ यांनी म्हटलं आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आमदार सरनाईक यांच्या टेलरबॉम्बने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांतील विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रिफ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.   

प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय वर्तुळात भाजप-सेना युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेनंही कडक भूमिका घेतली आहे. तर, राष्ट्रवादीनेही शिवसेना-एनसीपी एकत्र येईल, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता, याबाबत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रिफ यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. 

शिवसेनेच्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ही भाजपचीच चाल आहे. त्यामुळे, सरनाईक यांच्या पत्रावरुन महाविकास आघाडीत चुकीचा संदेश जाऊ नये, असे मुश्रिफ यांनी म्हटलं आहे. तसेच, मुश्रिफ यांनी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे नेते अन् कार्यकर्ते फोडले जात असल्याचा आरोप फेटाळला आहे. राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही, कोल्हापुर जिल्हा परिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरुन कुरबुरी झाल्या असतील, पण याचा अर्थ फोडाफोडी होत आहे, असा नाही. 

शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते फोडते, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. मात्र, शिवसेनेला हात लावायचा नाही, हे आमचं ठरलेलं आहे, असे मुश्रिफ यांनी म्हटलं. तसेच, भाजपाकडून सुडाचं राजकारण सुरू आहे, पण शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, असेही मुश्रिफ यांनी म्हटलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही १८ महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, असं पाटील म्हणाले. 

युती व्हावी ही मनापासून इच्छा असावी - पाटील

'शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या भूमिकेत आणि कार्यशैलीत खूप मोठा फरक आहे. त्यांची आघाडी अशास्त्रीय असल्याचं देवेंद्र फडणवीस १८ महिन्यांपूर्वीच सांगत होते. पण सत्ता लोहचुंबकासारखी असते. त्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली,' असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. सरनाईक यांच्या घरावर, मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयानं छापे टाकले. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला आहे का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांना युती व्हावी असं मनापासून वाटत असावं. शिवसैनिकांची आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनादेखील तसं वाटत असावं, असं पाटील म्हणाले.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाहसन मुश्रीफकाँग्रेस