Join us  

'टीकाकार' उद्धव ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गातात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:45 AM

कायम तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

मुंबई: शिवसेना-भाजपा या 'मित्र'पक्षांमधील मैत्री सर्वश्रुत आहे. गेल्या चार वर्षांपासून या दोन पक्षांची 'मैत्री' संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री कायम राज्याच्या हिताला प्राधान्य देतात. एक व्यक्ती म्हणून मी नेहमी त्यांच्यासोबत असेन, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना कृतज्ञता सन्मान द्यायचा असल्यास तो कोणत्या कारणासाठी द्याल, असा प्रश्न यावेळी उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर पुरस्कार मुख्यमंत्र्यांना पुरस्कार द्यायचा आहे की देवेंद्रजींना, असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी केला. यावर मुलाखतकर्त्यांनी देवेंद्रजींना कोणत्या कारणासाठी पुरस्कार द्याल, असा प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं. देवेंद्रजी हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांचा स्वभाव अतिशय मनमोकळा आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली. 'राजकारण करताना आम्ही अनेकदा राजकारणाच्या पलीकडे असलेल्या गोष्टी करतो. एखाद्या गोष्टीवर एकमत झालं की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी त्या गोष्टी लगेच मार्गी लावतात. राज्याच्या हिताला ते प्राधान्य देतात,' असं म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांची मुक्तकंठानं स्तुती केली. 'जेव्हा देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आलं, तेव्हा मी त्यांना लगेच पाठिंबा दिला. कारण तरुण आणि प्रामाणिक चेहरा आहे. ते त्या पद्धतीनं काम करत आहेत. व्यक्ती म्हणून कायम मी त्यांच्यासोबत असेन,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा