Join us  

अखेर ठरलं! उद्धव ठाकरे एनडीएच्या मेजवानीसाठी दिल्लीत जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 3:30 PM

 भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी  आज संध्याकाळी बोलावलेली एनडीएतील मित्रपक्षांची बैठक आणि मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे.

मुंबई  -  भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी  आज संध्याकाळी बोलावलेली एनडीएतील मित्रपक्षांची बैठक आणि मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला आणि मेजवानीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थिती लावली. मात्र उद्धव ठाकरे हे संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच उद्धव ठाकरेंऐवजी शिवसेनेचा कुणी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहील असे सूत्रांकडून सांगितले गेले. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र परदेशातून आल्याने उद्धव ठाकरे बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामागे कुठलीही नाराजी नाही, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. अखेरीस उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहतील, हे स्पष्ट झाले. 

एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीनंतर डीनर पार्टी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.  ही बैठक संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. यावेळी सर्वांना डीनर देण्यात येणार असून बैठकीला २९ नेत्यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत..   

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपालोकसभा निवडणूक २०१९महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019