Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 08:32 IST2025-11-18T08:31:14+5:302025-11-18T08:32:13+5:30
Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील स्मृतीस्थळावर राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी अभिवादन केले.

Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील स्मृतीस्थळावर राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी अभिवादन केले. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव व राज अनेक कार्यक्रमांतून एकत्र दिसले. परंतु, दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी ११ वर्षांनंतर हे दोघे एकत्र दिसले. राज यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस चाफ्याचा हार अर्पण केला. यानंतर त्यांनी स्मृतीस्थळी उद्धव, आदित्य, चंदू मामा यांच्यासोबत ते काही वेळ हाेते. उद्धव व राज यांच्यात यावेळी चर्चाही झाली. त्यांना एकत्र पाहून उपस्थित शिवसैनिक भावनिक झाले होते.
शाह, फडणवीस यांचीही आदरांजली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल माध्यमावर राष्ट्रविरोधी शक्तींविरोधात मजबूत ढालीसारखे उभे राहणाऱ्या बाळासाहेब यांनी संस्कृती, स्वधर्माच्या रक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, अशा शब्दात आदरांजली अर्पण केली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर आम्ही सातत्याने चालत राहू, अशा शब्दांत आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिले नाही : राज ठाकरे
देशात जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भाजपचा कमंडलवाद फोफावण्याआधी बाळासाहेबांनी हिंदू अस्मिता जागी केली. त्यांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पहिले नाही. बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवून त्यावर मते मागणाऱ्यांची गंमत वाटते, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप व शिंदेसेनेचे नाव घेता लगावला आहे.
सोशल माध्यमावर जुना फोटो पोस्ट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज यांनी सोशल माध्यमावर एक जुना फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर चळवळ निर्माण करून बाळासाहेबांनी राजकीय पक्षाला जन्म दिला. हिंदू हा त्यांच्यासाठी अस्मितेचा, धर्माप्रतीच्या प्रेमाचा विषय होता. ते करताना त्यांनी प्रबोधनकारांचा तर्कवादही जपला, असे राज यांनी पोस्टमध्ये नमुद केले आहे. मते व सत्ता मिळवणे, ती मिळाल्यावर वाट्टेल तसे ओरबाडणे म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना त्यांनी आधी समाजकारण, मग राजकारण हा विचार रुजविला, असेही राज यांनी म्हटले आहे.