Join us  

'ही' बाब चघळत न बसता निर्णय घेतला, संजय राऊतांकडून भाजप मुख्यमंत्र्यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:59 AM

देशात रोज साडेतीन लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही लहान मुलांच्या अनाथपणाचे संकट ही कोरोना काळातील भयंकर आपत्ती आहे

ठळक मुद्दे देशात रोज साडेतीन लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही लहान मुलांच्या अनाथपणाचे संकट ही कोरोना काळातील भयंकर आपत्ती आहे. या सर्व अनाथ मुलांच्या भविष्याचा विचार पालक म्हणून सरकारलाच करावा लागेल

मुंबई - शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. नेहमीच भाजपावर टीका करण्यात येणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून मध्य प्रदेशातीलभाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत, अभिनंदन करण्यात आलंय. अनाथ मुलांना दरमहा 5 हजार रुपये देण्याचा निर्णय शिवराजसिंह चौहान यांनी घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात दुर्दैवी घटनेतून अनाथ होण्याची वेळ आलेल्या बालकांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे. त्यामुळेच, शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपा नेत्याचं कौतुक केलंय.    

देशात रोज साडेतीन लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही लहान मुलांच्या अनाथपणाचे संकट ही कोरोना काळातील भयंकर आपत्ती आहे. या सर्व अनाथ मुलांच्या भविष्याचा विचार पालक म्हणून सरकारलाच करावा लागेल. सरकार केंद्राचे असो नाहीतर राज्यांचे, अशा मृत पालकांची व त्यांच्या निराधार मुलांची नोंद ठेवावी लागेल. या मुलांना आधी जगवावे लागेल. त्यांना आधार द्यावाच लागेल. त्यांना मानवतेची कवचकुंडले द्यावीच लागतील, जी मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

लोकांना जगायचे आहे, जे जगले नाहीत, ज्यांना राज्यकर्ते वाचवू शकले नाहीत त्यांच्या निराधार मुलांना आधार द्यावाच लागेल. हे सर्व करण्यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेतीलच, पण राज्यकर्ते अनाथ मुलांसाठी काय करू शकतात ते मध्य प्रदेशच्या सरकारने दाखवले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे आभार ! अशा शब्दात नेहमी केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर टीका करण्यात येत असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं कौतुक केलंय. 

अनाथ मुलांना 5 हजार पेन्शन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहिना पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या माणुसकीने ओथंबलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व त्यांच्या सरकारचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. देशात कोरोनाचे संकट अतिभयंकर स्थितीत पोहोचले आहे. कोरोना कुणालाच सोडत नाही. मुले, वृद्ध, तरुण, महिला अशा प्रत्येकालाच या राक्षसाचा विळखा पडला आहे. कोरोनामुळे माता-पित्यांना म्हणजे पालकांनाही प्राण गमवावे लागल्याने त्यांच्या लहान मुलांचे जगणे निराधार झाले. या मुलांचा सांभाळ करणारेही कुणी उरले नाहीत, अशा अनाथ मुलांचे कसे व्हायचे या चिंतेने अनेक सुहृदांची झोप उडाली आहे. अनाथ मुलांना कसा आधार द्यायचा, यावर अनेकांनी चर्चा व सूचना केल्या. महाराष्ट्रातही त्यावर चर्चा झाली, पण मध्य प्रदेशातील भाजप सरकारने ही गंभीर बाब नुसती चघळत न बसता या मुलांना पेन्शन देण्याचा निर्णय जाहीर केला. पेन्शन देण्याबरोबरच या मुलांच्या मोफत शिक्षणाचीही जबाबदारी शिवराजसिंह चौहान यांचे सरकार उचलणार आहे. 

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवराज सिंह चौहानकोरोना वायरस बातम्यामध्य प्रदेश