Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेनं सुरू केला 'दुसऱ्या' उमेदवाराचा शोध; दोन 'सीनिअर' शर्यतीत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:14 IST

दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरच्या जागेविषयीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेने संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर आता शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.

शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. शिवसेनेनं २ जागा लढवणं अपराध नाही. दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेने राज्यसभेसाठी संभाजीराजे यांच्या व्यतिरिक्त दूसऱ्या उमेदवाराचा शोध सुरु केला आहे.

'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का!

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आपल्या उमेदवाराचे लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाची देण्यात आलेली मुदत संपली असून आता ही जागा ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्याला देण्यात येणार, असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे नेते अडळराव पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मात्र शिवसेनेतील इतर नेत्यांनीही आपली नावं पक्षश्रेष्ठींकडे पोहचवली आहे, अशी माहिती शिवसेनेच्या विश्वासनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे एकंदरीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी कोणाला संधी देणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, मग ते कुणीही असो, असं संजय राऊत म्हणाले. तसेच आम्ही संभाजीराजेंना सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि शिवसेनेकडून राज्यसभेची जागा लढवा. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावलं मागे जाऊ, तुम्ही छत्रपती आहात, असं ते म्हणाले.  

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही- संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले की, ही माझी मन की बात नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मन की बात आहे. तसेच संभाजीराजेंना आमचा विरोध नाही. मात्र राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणं आम्हाला गरजेचं आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :शिवसेनाराज्यसभाउद्धव ठाकरेसंभाजी राजे छत्रपती