Join us  

Maharashtra Politics: “७० हजार तरुणांना रोजगार मिळणार होता, भूमिपुत्रांना न्याय कधी देणार”; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 5:17 PM

Maharashtra News: मुख्यमंत्री दिल्लीला आपल्या कामासाठी गेले आहेत की, इतर कामासाठी गेले आहेत, अशी खोचक विचारणा आदित्य ठाकरेंनी केली.

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, यावरून तापलेले राजकीय वातावरण अद्याप शमताना दिसत नाही. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. 

वेदांता प्रकरणावरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत, मुख्यमंत्री दिल्लीला आपल्या कामासाठी गेले आहेत की इतर कामासाठी गेले आहेत असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांनी राजकीय प्रश्नांवर अधिक भाष्य न करता रोजगार, आणि राज्यातील औद्योगिकीकरणावरच वेगवेगळ्या मुद्यांवर भर दिला. नोकरभरती करायची असेल तर मुंबई, नागपूर, पुणे ही शहरे सोडून युवकांच्या मुलाखती चेन्नईत का घेतल्या जात आहेत, अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी शिंदे-भाजप सरकारला केली. 

सरकारच्या नाकर्तेपणामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ

राज्यातील होणारी गुंवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगारामधून सगळ्यात आधी भूमीपुत्रांना न्याय दिला पाहिजे, त्यांना आधी रोजगार मिळाला पाहिजे. ७० हजार युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. 

दरम्यान, व्हॅक्सिन उत्पादनात राज्य सर्वोत्तम असूनही राज्यातील नवनवीन प्रकल्प इतर ठिकाणी का जातात, असा सवाल उपस्थित करुन नोकऱ्यांमध्ये आणि रोजगारात भूमीपुत्रांना पहिल्या प्रथम संधी द्या, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्क हा प्रकल्प ही राज्याबाहेर गेल्याचा दावा करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस