"सुधारणा झाली नाही तर डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही"; स्विगीला ठाकरे गटाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:35 IST2025-04-30T17:20:33+5:302025-04-30T17:35:47+5:30
शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात त्यांच्या मुंबईतील नोंदणीकृत कार्यालयावर धडक देत इशारा दिला आहे.

"सुधारणा झाली नाही तर डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही"; स्विगीला ठाकरे गटाचा इशारा
Akhil Chitre on Swiggy:स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सीकडून पार्श्वभूमी तपासली जात नाही, ऑर्डरची फसवणूक, पैसे अडवण्याचा प्रकार घडतात असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मरोळ येथील स्विगीच्या कार्यालयात जाऊन अनागोंदी कारभाराविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. जर स्विगीने ७ दिवसांच्या आत त्यांच्या सेवा सुधारल्या नाहीत तर त्यांच्या डिलिव्हरी बॉईजना मुंबईतून फिरू दिले जाणार नाही असा सज्जड दम शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिलेश चित्रे यांनी दिला आहे. यावेळी अखिल चित्रे यांनी स्वतः स्विगीच्या कार्यालयाचे शटर बंद केले.
"स्विगीच्या अनागोंदी कारभारावर शिव संचार सेनेने मुंबईतील नोंदणीकृत कार्यालयावर धडक दिली. ऑर्डरमधील फसवणूक, पैसे अडवून ठेवणं, डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची पार्श्वभूमी तपासून न घेता कामावर ठेवणं, हॉटेलबाबत चुकीची आणि खोटी माहिती दाखवणे, हे सगळे गैरप्रकार आता सहन करणार नाही. आठवडाभरात सुधारणा झाली नाही, तर यापुढे स्विगीची एकंही ऑर्डर पूर्ण होणार नाही. कारण आमच्यासाठी ग्राहकांचं म्हणजे आमच्या लोकांचं हित सर्वतोपरी आहे. स्विगीने हे लक्षात ठेवावे," असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला.
अखिल चित्रे यांनी स्विगीच्या व्यवस्थापनाला पत्र देखील लिहीलं आहे. "आमच्या महाराष्ट्राच्या मातीत, इथल्या खाद्य संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचा नव्हे, तर श्रद्धेचा, पावित्र्याचा विषय आहे. या पवित्र अन्नाबाबत जर हलगर्जीपणा झाला, तर तो केवळ ग्राहकांचाच नव्हे, तर इथल्या खाद्य संस्कृतीचा अपमान आहे. स्विगीचा महाराष्ट्रात व्यवसाय बहरला, तो इथल्या लोकांच्या समजूतदारपणामुळे, सुसंस्कृतपणामुळे आणि विश्वासामुळे. पण स्विग्गीला ह्याची जाणीव नाही असं तुमच्या सेवेतून उघडपणे दिसतं. कारण तुमच्याकडून ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली सुरू आहे आणि हे आम्ही शिवसैनिक म्हणून मुळीच सहन करणार नाही", असं अखिल चित्रे यांनी म्हटलं.
"अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या, आमचा संयम संपत चालला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करताना ग्राहकांचं सर्वतोपरी असायला हवं. जर स्विगीने तात्काळ सुधारणा केल्या नाहीत, तर शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही अखिल चित्रे यांनी दिला.
पत्रात कोणत्या तक्रारी?
ऑर्डरची फसवणूक : तुमचं अॅप अन्नपदार्थ व हॉटेलची उपलब्धता न पडताळता ऑर्डर स्वीकारतं, पैसे घेतं आणि नंतर "हॉटेल बंद" सांगून ऑर्डर रद्द करतं. ही सरळ सरळ ग्राहकांची थट्टा आहे.
पैसे अडवण्याचा प्रकार : ऑर्डर रद्द केल्यानंतर ३-५ दिवस पैसे परत करण्याचा फाजील नियम लावता. ही ग्राहकांची आर्थिक लूट आहे. पैसे घेताना क्षणार्धात घ्यायचे आणि परत करताना विलंब का? लोकांचे पैसे अडवून त्याचा गैरवापर केला जातोय का? हि कसली व्हाइट कॉलर दरोडेखोरी? एखाद्याकडे तितकेच पैसे असतील तर त्या गरिबाने काय करावं?
डिलिव्हरी एजंट्सची पार्श्वभूमी तपासणी : तुम्ही 'घरपोच सेवा' पुरवता अशा स्थितीत तुमच्या दूतांबद्दल लोकांमध्ये विश्वास हवा. त्यामुळे तुमच्या डिलिव्हरी बॉईजची शहानिशा होते का? भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी स्विगीची राहील, हे लक्षात ठेवा.
ग्राहक सेवा यंत्रणेत त्रुटी : चॅटबॉटद्वारे टोलवाटोलवी केली जाते. चॅट्स ताबडतोब रद्द केले जातात. इंग्रजीत संवाद साधला जातो. म्हणून महाराष्ट्रात मराठीत ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त करा.
हॉटेलची माहिती लपवणे : अन्न कुठून येते याची खरी माहिती लपवली जाते. फक्त अन्नाची छायाचित्रं दाखवून, ग्राहकांची दिशाभूल केली जाते. हॉटेलचा फोटो, त्याची स्वच्छता, दर्जा ग्राहकांना माहीत असायला हवा. हा त्यांच्या सुरक्षिततेचा मूलभूत हक्क आहे.