Shiv Sainik is working for rebel candidate | बंडखोर उमेदवारासाठी राबताहेत शिवसैनिक
बंडखोर उमेदवारासाठी राबताहेत शिवसैनिक

मनोहर कुंभेजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर व शिवसेना बंडखोर उमेदवार राजुल पटेल यांच्यात चुरशीची लढत आहे. राजुल पटेल यांच्या प्रचारात येथील शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनिकांची फौज उतरल्याचे चित्र आहे.
लव्हेकर यांच्या प्रचारासाठी येथील चित्रकूट मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे १५ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता लोखंडवालाच्या सेलीब्रेशन क्लब येथे येत आहेत. येथील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला मानणारे असून महायुतीने गेल्या ५ वर्षांत नेत्रदीपक कामगिरी केले आहे. परिणामी बंडखोराचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी भाषणात व्यक्त केला.
राजुल पटेल या १९९७ पासून पालिकेच्या नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व करतात. त्या अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या महिला विभाग संघटक आहेत. येथून शिवसेनेला उमेदवारी हवी होती. मात्र महायुतीच्या गठबंधनात हा मतदारसंघ शिवसंग्रामला गेला. लव्हेकर यांना उमेदवारी मिळाल्याने राजुल पटेल यांनी बंडखोरी केली.
येथून एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून लव्हेकर-पटेल व काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा, मनसेचे संदेश देसाई, वंचितचे अब्दुल हमीद हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथे चुरशीची लढत आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आहे. पटेल यांनी महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार रमेश लटके यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. काँग्रेसचे नगरसेवक व उमेदवार जगदीश अमीन कुट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथे चुरशीची लढत आहे.

नगरसेवकाच्या मुलाच्या बंडखोरीची काँग्रेसला चिंंता

मुंबई : कलिना मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारासमोर काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाचे आव्हान असून, या बंडखोरीचा फटका पक्षाला बसणार आहे.
काँग्रेसने माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहम यांना कलिना विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. ते या विधानसभेतील तीन वेगवेगळ्या वार्डांमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत़ १० वर्षांपूर्वी त्यांनी शेवटची निवडणूक लढविली होती. १० वर्षांचे अंतर पडल्यामुळे त्यांंच्या जनाधारावर परिणाम होऊ शकतो. अब्राहम यांच्यासोबत माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा आणि नगरसेवक रफिक शेख हेही इच्छुक होते, परंतु पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने रफिक शेख यांच्या मुलाने अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
सध्या नगरसेवक असलेले रफिक शेख हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आहेत, तर त्यांचा मुलगाही काँग्रेसच्या मायनॉरिटी सेलमध्ये पदावर होता. त्यांना आपल्या वार्डमध्ये जनाधार आहे, त्यामुळे त्यांना पडणाऱ्या मतांमुळे काँग्रेसचे नुकसान होणार आहे.

खोत यांच्या बंडखोरीमुळे सेनेच्या उमेदवाराला डोकेदुखी
- जमीर काझी

मुंबई : मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सपाचे आमदार अबू आझमी व शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांच्यात प्रामुख्याने लढत होत असली तरी महायुतीचा घटक असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या रवींद्र खोत यांनी बंडखोरी केली आहे. सेनेतील अंतर्गत वाद असतानाच खोतांची उमेदवारी लोकरे यांची डोकेदुखी वाढवणार आहे. मतविभागणीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघातून दोनवेळा प्रतिनिधित्व करीत असलेल्या अबू आझमी यांना कॉँग्रेस आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्याउलट महिन्याभरापूर्वी कॉँग्रेसमधून स्वगृही परतलेल्या नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने सेनेतील सुरेश (बुलेट) पाटील यांचा गट नाराज होता. पक्ष नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र अद्यापही शिवसैनिकांत एकवाक्यता दिसत नाही. त्यामुळे लोकरे हे प्रचाराबरोबरच नाराजांची समजूत काढीत आहेत. त्याचबरोबर महायुतीचा घटक असलेल्या रवींद्र खोत यांनीही बंडखोरी केली आहे. एकूण १० उमेदवारांमधून प्रमुख लढत आझमी व लोकरे यांच्यात होत असून इतरांचे अस्तित्व मते खाण्यापुरतेच आहे. खोत यांचे स्थान नगण्य असले तरी त्यांना जी काही मते मिळतील, ती लोकरे यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहेत. खोत यांच्याकडे दुर्लक्ष करण्याबाबत आवाहन करावे लागत आहे.


Web Title: Shiv Sainik is working for rebel candidate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.