Join us  

'शिवभोजन थाळीच्या लाभार्थींपेक्षा जास्त लोक गुरुद्वारामध्ये जेवतात, तेही फुकट'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 3:12 PM

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कलेल्या शिवभोजन थाळीला राज्यभरात सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी राज्यभरात 11,417 जणांनी या थाळीचा लाभ घेतला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या शिवभोजन योजनेवरुन सरकारवर टीका केलीय. 

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी 11 हजार 417 नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांनी नाशिक येथून शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला होता. 

आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन ही आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, थांळ्यांच्या कमतरतेचा उल्लेख करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय.  12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ 18 हजार थाळी. तर, नांदेडमध्ये फक्त 500 लोकांना जेवण, ही गरिबांची थट्टा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. तर, गुरुद्वारामध्ये यापेक्षाही जास्त लोकं जेवतात, तेही फुकट.. अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवभोजनालयउद्धव ठाकरेछगन भुजबळ