अमेरिकेत फराळ पाठवणे ‘टेरिफ बॉम्ब’मुळे महागले; दरवर्षीच्या तुलनेत यंदा मागणीत २५ टक्क्यांची घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:06 IST2025-10-15T07:06:05+5:302025-10-15T07:06:19+5:30
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाइकांना कुरिअरद्वारे फराळ पाठवतात.

अमेरिकेत फराळ पाठवणे ‘टेरिफ बॉम्ब’मुळे महागले; दरवर्षीच्या तुलनेत यंदा मागणीत २५ टक्क्यांची घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे यंदा कुरियर कंपन्यांमार्फत पाठविण्यात येणाऱ्या फराळाच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर टेरिफ शुल्क नेमके कसे आणि कुठे आकारले जाणार याबाबत संभ्रम असल्यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा फराळ पाठवण्यात २५ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती या उद्योगातील व्यावसायिकांनी दिली.
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाइकांना कुरिअरद्वारे फराळ पाठवतात. त्यात प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, दुबई, न्यूझीलंड, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांचा समावेश आहे. यंदा मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ‘टेरिफ बॉम्ब’ टाकल्यामुळे नेमक्या कोणत्या पदार्थांवर किती टेरिफ शुल्क आकारले जाणार आहे, याबाबत संभ्रम आहे.
किमती गेल्यावर्षीप्रमाणेच ठेवल्या
यासंदर्भात अनेक देशांत फराळाची निर्यात करण्यात अग्रेसर असलेल्या फॅमिली स्टोअरचे संचालक अभिजित जोशी यांनी सांगितले की, टेरिफ शुल्कातील संभ्रमामुळे २५ टक्के घट आतापर्यंत दिसून आली आहे.
यावर तोडगा म्हणजे आम्ही किमती गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवल्या आहेत. ज्यांनी आतापर्यंत विशेषतः अमेरिकेत फराळ पाठवला आहे व ज्यांना तो तिथे मिळाला आहे त्यांनी तिथे फराळाच्या वजनानुसार किमान २० ते कमाल ४० अमेरिकी डॉलर भरून तो प्राप्त करून घेतला आहे.
सरस फूडचे मालक सुनील शेवडे यांनी दिवाळी फराळ हॅम्पर योजना तयार केली आहे. त्यानुसार ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत ३५० किलो फराळ परदेशात पाठवला. अमेरिकेत ३ ते ६ किलोपर्यंत प्रतिकिलो १,९९९ तसेच ७ किलोच्या वर १,६९९ रुपये घेतले जातात. त्यात कुररिअर चार्जेस, ड्यूटी आणि टेरिफ यांचा समावेश आहे, असे शेवडे यांनी सांगितले.
मे महिन्यात मी कॅनडात माझ्या मुलाला आणि सुनेला ७९५ रुपये किलो दराने फराळ, कपडे, भांडी पाठवली होती. आता कुररिअरचे दर वाढले असून, ८७० रुपये दराने फराळ पाठविला.
- स्मिता धर्म, रहिवासी, मालाड