मुंबई शहरात शिंदेसेनेची कसोटी; मराठी मतदारांच्या प्रभागात उद्धवसेनेचाच प्रभाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:48 IST2025-12-18T11:47:59+5:302025-12-18T11:48:19+5:30
५६ पैकी २२ माजी नगरसेवकांचे बळ

मुंबई शहरात शिंदेसेनेची कसोटी; मराठी मतदारांच्या प्रभागात उद्धवसेनेचाच प्रभाव कायम
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर भागात उद्धवसेनेचे वर्चस्व कायम असून, शिंदेसेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये उद्धवसेनेसोबत २२ माजी नगरसेवक आहेत. दुसरीकडे शिंदे यांच्याकडे केवळ सहा नगरसेवक गेले आहेत.
शहर भागातील १० विधानसभा मतदारसंघांतही उद्धवसेनेचे चार आमदार निवडून आले आहेत. शिंदेसेनेच्या एकाही उमेदवाराला यश मिळाले नसल्याने महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेची कसोटी लागणार आहे.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत शहरातील ५६ प्रभागांमध्ये एकसंघ शिवसेनेचे २६, भाजपचे १४, काँग्रेसचे ११, मनसेचे २, तर समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व अभासेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता.
शिंदेसेनेकडे ११ माजी नगरसेवक
शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धवसेनेकडे पक्षाचे २० व मनसे, काँग्रेसचे प्रत्येकी एक, असे एकूण २२ माजी नगरसेवक आहेत, तर शिंदेसेनेत उद्धवसेनेचे ६, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक, अशा ११ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी, मनसेची पाटी कोरी
भाजपकडे १४ माजी नगरसेवकांसह काँग्रेसमधून आलेले २, असे एकूण १६ संख्याबळ आहे. काँग्रेसकडे ११ पैकी केवळ ५ माजी नगरसेवक उरले आहेत, तर मनसे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे एकही माजी नगरसेवक उरलेला नाही.
एकूणच शहरात संघटनात्मक ताकद, माजी 3 नगरसेवकांचे संख्याबळ आणि मतदारांचा विश्वास या निकषांवर उद्धवसेना मजबूत स्थितीत दिसत असून, शिंदेसेनेचा या बालेकिल्ल्यात कस लागणार आहे.
पक्षीय बलाबल
२०१७ची स्थिती
एकसंघ शिवसेना - २६
भाजप - १४
काँग्रेस - ११
मनसे - ०२
सपा - ०१
राष्ट्रवादी - ०१
अभासे - ०१
आताची स्थिती
उद्धवसेना - २२
भाजप - १६
शिंदेसेना - ११
काँग्रेस - ०५
सपा - ०१
अभासे - ०१
मनसे - ००
राष्ट्रवादी - ००
१८ जण दुसऱ्या क्रमांकावर
२०१७ च्या निवडणुकीत शहरातील शिवसेनेच्या २६ माजी नगरसेवकांपैकी सर्वाधिक मते घेणारे पहिले पाच जण हे मराठीबहुल शिवडी, वरळी या मतदारसंघातील होते. तर, १८ पराभूत उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकांची मते मिळविली होती.
सात गुजराती प्रभागांमध्ये भाजपचेच वर्चस्व
गुजराती मतदारांचे वर्चस्व असलेल्या सातही प्रभागांत भाजपचे, तर मुस्लिमबहुल १६ पैकी ९ प्रभागांत काँग्रेस, भाजप ३, शिवसेना २ व समाजवादी पार्टी, अभासे, राष्ट्रवादीचे १ उमेदवार निवडून आले होते.
२९ प्रभागांमध्ये मराठी मतदार अधिक
मुंबई शहरातील ५६ प्रभागांपैकी भायखळा, लालबाग, परळ, दादर या मराठीबहुल मतदारांच्या २२ प्रभागांत उद्धवसेनेचे २२, भाजपचे ३, मनसेचे २, काँग्रेसचे २, असे माजी नगरसेवक निवडून आले होते.