शिंदेसेनेच्या शेवाळेंवर साडी वाटपाचा आरोप; उद्धवसेनेकडूनच स्टंटबाजी; शिंदेसेनेचा प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:15 IST2025-12-23T10:15:16+5:302025-12-23T10:15:49+5:30
कामिनी शेवाळे या मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४२ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांनी या साडी वाटप केल्याचा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केला.

शिंदेसेनेच्या शेवाळेंवर साडी वाटपाचा आरोप; उद्धवसेनेकडूनच स्टंटबाजी; शिंदेसेनेचा प्रत्यारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिंदेसेनेचे माजी खा. राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी चेंबूर परिसरात साडी वाटप केल्याचा आरोप उद्धवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला आहे. तसेच साडीवाटपाला विरोध करत स्थानिकांनी त्या साड्यांची होळी केल्याचा दावाही त्यांनी केला. तर शिंदेसेनेने हा आरोप फेटाळून लावला असून उद्धवसेनेनेच हा स्टंट केल्याचा प्रत्यारोप केला.
कामिनी शेवाळे या मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४२ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांनी या साडी वाटप केल्याचा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केला.
आज मी वॉर्ड क्रमांक १४२ मध्ये फिरलो. तेव्हा माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, शेवाळे आणि त्यांचे कार्यकर्ते साडी वाटप करत आहेत. निवडणूक लढण्यासाठी कामिनी शेवाळे यांनी जनतेची कामे करावी, असे साड्या वाटप करू नये, असे लोकरे म्हणाले. आम्ही तक्रार केल्यानंतर महापालिकेचे भरारी पथक आले आणि साड्या जप्त करून घेऊन गेले, असेही लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शेवाळेंना बदनाम करण्याचा प्रयत्न : आ. मनीषा कायंदे
शिंदेसेनेच्या आ. मनीषा कायंदे यांनी शेवाळे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. नगर परिषद निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे उद्धवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वतःच कुठूनतरी साड्या आणल्या आणि पेटवून दिल्या असतील. कामिनी शेवाळे यांचीच नाही तर कोणाचीच उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे उद्धवसेनेने केलेली ही केवळ स्टंटबाजी आहे. राहुल आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप कायंदे यांनी केला आहे.