Join us

जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 13, 2025 19:03 IST

जगद्गुरु शंकराचार्य यांनी मराठीतून साधला संवाद. 

मुंबई- 'मनसेचे प्रमुख राज ठाकरे व उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मराठी शिकवावी. मी दोन महिने मुंबईत असणार आहे. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेन. दोन महिन्यानंतर मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल', असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती  म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा जोरदार रंगली होती. 

त्यानंतर आता जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शिंदे सेनेने मराठीचे धडे द्यायला आज पासून सुरवात केली आहे. यासाठी मागाठाणेचे शिंदे सेनेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी त्यांना मराठी शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मुक्काम चातुर्मासनिमित्त दोन महिने बोरीवलीत आहे. चातुर्मासनिमित्त मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्रात ३३ कोटी यज्ञकुंडाचं आयोजन केले आहे. आ. सुर्वे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य यांनी मराठीत संवाद साधला. 

याबाबत आ.सुर्वे यांनी लोकमतला सांगितले की, शंकराचार्य यांना अनेक भाषा येत असून ते मराठी पण उत्तम बोलतात. मात्र त्यांना अधिक चांगल्या प्रकारे मराठी बोलता यावे, यासाठी उद्यापासून त्यांना मराठीची शिकवणी देणारा चांगला शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे. शंकराचार्य हे दोन महिन्यानंतर स्पष्ट मराठी बोलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान आ.सुर्वे यांनी आजपासून त्यांना सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत मराठी शिकवण्यासाठी चारकोपच्या एकविरा विद्यालयाचे शिक्षक शिवाजी शेंडगे व पंकज पाटील तसेच दहिसर विद्यामंदिराचे शिक्षक सुभाष डुबे या तिघा शिक्षकांची एक टीम तयार केली आहे. त्यांना उत्तम संस्कृत व हिंदी येते. आज पासून आम्ही बाराखडीपासून त्यांना मराठी भाषा शिकवायला सुरवात केल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

टॅग्स :मराठीशिवसेनाएकनाथ शिंदेमनसेहिंदी