Join us  

'ताईंना राष्ट्रवादीतून आयात करुन आणलं'; शीतल म्हात्रेंची सुषमा अंधारे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 10:52 PM

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले.

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात ४० बंडखोर उभे करण्यात आले होते. तेव्हा तुम्ही काय करत होता? रमेश लटके हा आपला भाऊ गेलाय. त्याची विधाव पत्नी लढतेय. तिच्याविरोधात तुम्ही भाजपला साथ देत आहात आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहात? असा सवाल करतानाच बीकेसीत इव्हेंट करणारे तुम्ही हिंदुत्व जपणार? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालंय, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.

 दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचाच आवाज घुमला; गाठली 'इतकी' पातळी...

सुषमा अंधारेंच्या या टीकेवर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शिवतीर्थावर जो दसरा मेळावा झाला, त्यामध्ये कोणतरी ताई या बोलत होत्या. त्या ताईंना दोन-तीन महिन्यांआधी राष्ट्रवादीतून आयात करुन शिवसेनेत आणलं गेलं. या ताईंनी याआधी कधीही शिवसेनेचा झेंडा पकडला नसेल किंवा शिवसेनेच्या मेळाव्यात सामील झाल्या नाही. कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नाही. त्या ताई गेले २५ ते ३० वर्षे शिवसेनेसाठी अनेक केसेस अंगावल घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताय. त्यामुळे ताईंना कसं काय जमतं बुवा..,असा प्रश्न पडतो अशी टीका शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे दहा वर्षे लोटांगण घालून आमदार, खासदार आणि महसूल मंत्रीपद मिळविले. किरण पावस्कर दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे हिंदूत्व कुठे गेले होते, असा सवाल करीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर नेत्यांवर टीका केली आणि त्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे यांच्यामागे एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांच्या जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना