शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:38 IST2025-10-08T15:31:03+5:302025-10-08T15:38:10+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना परदेश प्रवास करण्यास मनाई केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना ६० कोटी भरण्याचे आदेश दिले आहेत.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या जोडप्याला परदेश प्रवास करण्यास मनाई केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि तिच्या पतीला ६० कोटी भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती. हा आदेश अजूनही लागू आहे, यामुळे शिल्पा आणि राज यांना न्यायालयाच्या किंवा तपास यंत्रणेच्या परवानगीशिवाय परदेश प्रवास करता येणार नाही.
कोलंबोला जाण्यासाठी परवानगी मागितली होती
शिल्पा शेट्टी एका कार्यक्रमासाठी कोलंबोला जाणार होती, पण मुंबई उच्च न्यायालयाने तिला देश सोडून जाण्याची परवानगी नाकारली. शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की अभिनेत्री २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान यूट्यूब कार्यक्रमासाठी कोलंबोला जाणार आहे. परिणामी, न्यायालयाने निमंत्रण पत्रिका मागितली. यावेळी शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी फक्त फोनवर बोलणे करुन निमंत्रण दिल्याचे सांगितले.
सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार
मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी तात्काळ फेटाळून लावली. परदेशात प्रवास करण्याची परवानगी मागण्यापूर्वी या जोडप्याने फसवणूक प्रकरणात आधी ६० कोटी रुपये द्यावे लागतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होईल, असा निर्णय न्यायालयाने दिला.
गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा आणि राज यांना थायलंडमधील फुकेत येथे जाण्यास मनाई केली होती.