मुंबई : गोवंडीतील रहिवासी असलेले मोहम्मद अली शेख यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटून कारागृहातून बाहेर आल्यावर, एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. अखेर सत्याचा विजय झाल्याचे ते म्हणाले. शेख यांनी सांगितले, आम्हाला फसवून एक कहाणी रचण्यात आली आणि कारागृहात टाकण्यात आले. आमची सत्याची लढाई सुरू होती. आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढत होतो आणि हायकोर्टाने आमचे ऐकले. सत्र न्यायालयाने मात्र लक्ष दिले नव्हते. ज्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, त्यानेदेखील नंतर काही बघितले नसल्याचे सांगितले. सगळ्या गोष्टी उच्च न्यायालयाने जाणून घेतल्या. आम्ही घरात १४ जण राहायचो. एवढे जण घरात असताना अतिरेकी कसे राहणार? तसेच ज्या दिवशी स्फोट झाले त्या दिवशीदेखील मी घरीच होतो. परिसरातील ब्ल्यू फिल्म पार्लर आम्ही आंदोलन करून बंद पाडले होते, म्हणून मला टार्गेट करण्यात आले. दोन महिने मला अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्यात आले. कुटुंबीयांना धमकाविण्यात आले. तेव्हा त्यांनी रचलेल्या एका कहाणीवर माझी सही आणि कॅमेरासमोर कबुली घेतली, असेही शेख यांनी सांगितले.
काय होता आरोप?गोवंडीच्या शिवाजी नगर झोपडपट्टीत असलेल्या शेख यांच्या घरात पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने शेख आणि अन्य आरोपींनी बॉम्ब तयार केले, असा आरोप एटीएसने ठेवला होता. हैदराबाद येथून औषधे विकत घेऊन ती मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधील युनानी डॉक्टरांना पुरविण्याचा व्यवसाय करणारा शेख हा सिमीचा कार्यकर्ता होता.
पॅरोलवर तुरुंगाबाहेर येण्यासाठीही २ लाख रुपये मागितले!वडील आणि भावाचा मृत्यू झाला, तेव्हा चार दिवसांचा पॅरोल मिळाला होता. मात्र, त्यावेळी दोन लाख रुपये मागण्यात आले. माझ्याकडे तेही नव्हते म्हणून मी बाहेर येऊ शकलो नाही. त्यांच्या अंतिम संस्कारासाठीदेखील जाता आले नाही याचे मोठे दुःख आहे. मुलीच्या लग्नालादेखील येता आले नाही. संपूर्ण कुटुंबाला झळा बसल्या त्या सगळ्याला एटीएस जबाबदार आहे. माझ्यासह संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, असेही शेख यांनी सांगितले.