चार भिंतीआडही ‘ती’ असुरक्षितच! मुंबईत महिलाविरोधी गुन्हे सहा हजारांवर

By मनीषा म्हात्रे | Updated: March 6, 2025 11:03 IST2025-03-06T11:01:57+5:302025-03-06T11:03:45+5:30

‘पोलिस दीदी’मुळे अत्याचाराला वाचा 

she is still unsafe even outside four walls crimes against women in mumbai cross 6000 | चार भिंतीआडही ‘ती’ असुरक्षितच! मुंबईत महिलाविरोधी गुन्हे सहा हजारांवर

चार भिंतीआडही ‘ती’ असुरक्षितच! मुंबईत महिलाविरोधी गुन्हे सहा हजारांवर

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्यातील स्वारगेट प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांवरील अत्याचाराचा आकडा सहा हजारांवर पोहोचला आहे. हा आकडा चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे घरातही ‘ती’ असुरक्षित असल्याचे विविध घटनांतून समोर येत आहे. यामध्ये ओळखीच्या, जवळच्या व्यक्तीकडून अत्याचाराच्या सर्वाधिक घटनांचा समावेश आहे. 

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी बलात्काराचे १०५० गुहे नोंद झाले. त्यापैकी ९८३ गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. याच काळात १२३१ अल्पवीन मुलींच्या अपहरणाची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. जास्तीत जास्त कारवाई हाच तूर्तास अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याचा पर्याय आहे.

महिलाविरोधी गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे आणि महिलांच्या विनयभंगाचे आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत २३९७ महिला, तरुणींनी विनयभंगाची तक्रार केली आहे. २०२३ च्या तुलनेत गुन्हे वाढल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. येथील बहुतांश वस्त्या बहुभाषिक आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस ठाण्यांची संख्या वाढली. मात्र उपलब्ध मनुष्यबळ लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडते.

दुसरीकडे, कधीकाळी बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्यांच्या तक्रारी पुढे येत नव्हत्या. त्यामागे अनेक कारणे होती. मात्र, गेल्या काही वर्षांत गुन्हा घडला की तो उघड व्हावा, पोलिस ठाण्यात त्याची तक्रार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यात आली.  परिणामी, घटना घडताच तक्रारदार पुढे येत आहेत. त्यामुळेही मुंबई शहरात तुलनेने अधिक गुन्हे नोंद होत आहेत. 

५,९१८ गुन्ह्यांची उकल 

गेल्यावर्षी दाखल ६३२७ पैकी ५९१८ गुन्ह्यांची(९२ टक्के) उकल करत आरोपी अटक केले. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आली. 

या अधिकाऱ्याच्या मते सर्वाधिक गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तीकडून अगदी चार भिंतींच्या आड होतात. त्यामुळे जास्तीत जास्त कारवाई हाच तूर्तास अशा प्रकारचे गुन्हे रोखण्याचा पर्याय आहे.

जानेवारीत ६२२ गुन्हे नोंद

यावर्षी जानेवारी महिन्यात महिला अत्याचार संबंधित ६२२ गुन्हे नोंद असून त्यापैकी ४४७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये बलात्काराचे (८२), अपहरण (१२८) आणि विनयभंग (२३१) गुन्ह्यांची नोंद आहे. 

भेटण्यास टाळाटाळ करते म्हणून पेटवले 

भेटण्यास टाळाटाळ करत असल्याच्या रागातून मित्राने अल्पवयीन मुलीला पेटवून दिल्याच्या घटनेने हादरवले. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पेट्रोल टाकून पेटवताना जखमी झालेल्या तिच्या मित्रावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

मुंबई पोलिसांनी ‘पोलिस दीदी’ हा उपक्रम सुरू केला आहे. पोलिस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना चांगला-वाईट स्पर्श याबाबत प्रशिक्षित करतात. यामुळे घटनांना वाचा फोडण्यास मदत होते.
 

Web Title: she is still unsafe even outside four walls crimes against women in mumbai cross 6000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.