Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने चौकशी केलेली 'ती' अभिनेत्री नव्या नायर! सचिन सावंतने दिल्या महागड्या गिफ्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 06:15 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यवधींची माया गोळा केल्याप्रकरणी सचिन सावंत याची चौकशी करताना ईडीच्या अधिकाऱ्यांना सावंत आणि नव्या यांच्यात झालेले चॅट्स आढळले.

मुंबई : उत्पन्नापेक्षा जास्त माया गोळा केल्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेला भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी सचिन सावंत याने अग्रगण्य मल्याळी सिनेतारका नव्या नायर हिला विविध प्रकारचे दागिने आणि अनेक महागडी गिफ्ट दिल्याची माहिती ईडीच्या तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी नव्या नायरची दोनच दिवसांपूर्वी ईडीने मुंबईत चौकशी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यवधींची माया गोळा केल्याप्रकरणी सचिन सावंत याची चौकशी करताना ईडीच्या अधिकाऱ्यांना सावंत आणि नव्या यांच्यात झालेले चॅट्स आढळले. सावंतने नव्याला अनेक गिफ्ट व दागिने दिल्याची माहितीही तपासात अधिकाऱ्यांना मिळाली. तिलाच नव्हे तर तिच्या मुलालाही वाढदिवशी सावंत याने भेटवस्तू दिल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. मात्र, सावंत आणि आपली मैत्री असून, केवळ मित्र म्हणून आपण त्याच्याकडून भेटवस्तू स्वीकारल्याचे नव्याने तपास अधिकाऱ्याने सांगितले.

सावंत याने नव्याला दिलेल्या भेटवस्तू या सावंत याने गैरमार्गाने मिळविलेल्या पैशांतून दिल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय असून, त्याच अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली होती. दरम्यान, सावंत याच्या वडिलांच्या नावे एक बेनामी कंपनी असल्याचीही माहिती तपासात उघड झाली असून, या कंपनीद्वारे सावंतच्या पत्नीला नियमित पगार मिळत होता. मात्र, या कंपनीमध्ये सव्वा कोटी रुपये रोखीने भरल्याची बाबही पुढे आली आहे.

टॅग्स :मुंबईअंमलबजावणी संचालनालय