Join us  

शरद पवारांनी सांगितला ऑपरेशन लोटसचा अर्थ अन् ‘ठाकरे सरकार’चं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 8:55 AM

शरद पवार यांनी भाजपाकडून विविध राज्यात राबवण्यात येत असलेले ऑपरेशन लोटसचा नेमका अर्थ सांगतानाचा राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे.

ठळक मुद्देऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणे, अस्थिर करणं आणि त्यासाठी केंद्रातील सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणेराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेलऑपरेशन लोटस असो किंवा आणखी काय? त्याचा या सरकावर काहीही परिणाम होणार नाही

मुंबई - देशात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर विविध राज्यांमधील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी वाटेल तशा तडजोडी करणाऱ्या भाजपावरराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत शरद पवार यांनी  भाजपाकडून विविध राज्यात राबवण्यात येत असलेले ऑपरेशन लोटसचा नेमका अर्थ सांगतानाचा राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे.

शरद पवार म्हणाले की, ‘’ऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणे, अस्थिर करणं आणि त्यासाठी केंद्रातील सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणे होय.’’

राज्यात ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाईल, असं सांगण्यात येत आहे, असा सवाल विचारला असता त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा तीन महिन्यात ऑपरेशन लोटस राबवले जाईल असे सांगत होते. त्यानंतर आता सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबर महिना सांगितला जात आहे. तर काही जण ऑक्टोबरमध्ये ऑपरेशन लोटस राबवले जाईल, असं म्हणताहेत. मात्र मला खात्री आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल. तसेच ऑपरेशन लोटस असो किंवा आणखी काय? त्याचा या सरकावर काहीही परिणाम होणार नाही.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत ही आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे, शिवसेनेच्या स्थापनेपासून मी पाहतोय की, आदेश येतो आणि आदेश आल्यानंतर त्यावर चर्चा होत नाही. मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या विचाराने वाढले आहेत. त्यात वरिष्ठांच्या मतांचा आदर केला जातो. मात्र वरिष्ठांकडून आदेशच येतो, असं होत नाही. एखादं मत मांडलं गेलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. आमच्या कार्यकारिणीच्या कामाची ही पद्धत आहे. मात्र शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतली की, त्यावर अंमलबजावणी करायची ही पद्धत सर्वांमध्ये आहे. त्याच विचाराने शिवसेना चालली आहे आणि यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे त्याच पठडीतले आहेत आणि त्यांच्या कामाची पद्धती तीच आहे. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही.

टॅग्स :शरद पवारमहाराष्ट्र विकास आघाडीराजकारणभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस