Join us

"भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडे तक्रार आली, फडणवीसांनाही सांगितलं"; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:01 IST

फडणवीसांच्या 'व्हिडिओ बॉम्ब'नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत एक महत्वाची माहिती सर्वांसमोर आणली आहे.

मुंबई-

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारला धक्का देत सरकार विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचं षडयंत्र रचत असल्याचे व्हिडिओ पुरावे सादर करुन खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या 'व्हिडिओ बॉम्ब'नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत एक महत्वाची माहिती सर्वांसमोर आणली आहे. भाजपाच्या एका नेत्याची तक्रार आपल्याकडे आली होती आणि याची माहिती आपण देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ दिली होती, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"भाजपाच्या एका नेत्याची तक्रार माझ्याकडेही आली होती. पण त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहा असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी जेव्हा सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणूनच मी फडणवीसांकडे ही तक्रार केली होती. त्यावर फडणवीसांकडून तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत मी लक्ष घातलं आहे. यापुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ असं मला कळवलं गेलं होतं", असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर पवारांनी फडणवीसांकडे तक्रार केलेला तो भाजपाचा नेता कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

१२५ तासांचं रेकॉर्डिंग हे कौतुकास्पद- पवारएखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन १२५ तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही पवार म्हणाले. "फडणवीसांनी ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. पण मला कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही", असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. 

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना