शरद पवार वाचत आहेत 'गोलवलकर गुरूजींचे विचारधन', जाणून घ्या RSS बद्दल पवारांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:42 IST2018-09-27T17:28:46+5:302018-09-27T17:42:18+5:30
सध्या मी गोलवलकर 'गुरुजींच विचारधन' धन हे पुस्तक वाचत आहे. ते पुस्तक मोठं असल्यामुळे मी ते सोबत वागवत नाही.

शरद पवार वाचत आहेत 'गोलवलकर गुरूजींचे विचारधन', जाणून घ्या RSS बद्दल पवारांचे मन
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरएसएस संदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे. सध्या आरएसएसकडून संघटनेचे रिपोजिशनींग करण्याचे काम सुरू आहे, गोलवलकर रिडिफाईंड असा शब्दप्रयोगही झाला ? त्यासाठी दिल्लीत 3 दिवस मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता, याबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, पवारांनी संघाकडून प्रतिमा उभारण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले. तर, सध्या मी गोलवलकर गुरुजींचे विचारधन हे पुस्तक वाचत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या मी गोलवलकर 'गुरुजींचे विचारधन' धन हे पुस्तक वाचत आहे. ते पुस्तक मोठं असल्यामुळे मी ते सोबत वागवत नाही. त्यामुळे, मी पुण्यात एक, मुंबईत एक आणि दिल्लीत एक पुस्तक माझ्याकडे ठेवलं आहे. त्यामुळे जिथं असेल तिथं मी ते पुस्तक वाचतो, असे पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटले. तसेच संघाकडून दोन प्रकारे आपली प्रतिमा उभारण्याचे काम सुरू असते, असे म्हणत म्हाळुंगे येथील कार्यक्रमाचा दाखलाही पवारांनी दिला. आपत्तीवेळी संघाचे कार्यकर्ते धावत -पळत जातात. भूकंपावेळी मदतीला ज्या संस्था आल्या त्यात आरएसएस होती, महापूर आला तेथंही आरएसएसचे लोक पुढे होते. एकीकडे विधायक कार्यातून आपली प्रतिमा तयार करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न आरएसएसकडून केला जातो. तर दुसऱ्या बाजूत समाजातील मध्यमवर्ग, उच्चवर्गीय, इंटीग्रेटेड सेक्शन आणि मीडिया यांच्याशी सामजस्य राखणं, वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करणं म्हणजे आमचं ओपन हाऊस आहे, हे दाखविण्याचाही संघाचा प्रयत्न असतो, असे पवार यांनी म्हटले. एकंदरीत संघ परिवारावर बोलतानाही त्यांनी कुठलिही टीका-टीपण्णी न करता, एकप्रकारे संघाच्या कामाचं कौतूकच केलं आहे.