Join us  

Sharad Pawar: राष्ट्रवादी लागली निवडणुकांच्या तयारीला, शरद पवारांकडून मंत्र्यांना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 1:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व खासदारांची बैठक बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारा यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये, या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबतचा सल्ला शरद पवार यांनी सर्वच नेत्यांना दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढविण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यासही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व खासदारांची बैठक बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, बैठकीत झालेला वृत्तांत आणि चर्चाबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच, राज्यात सुरू असलेल्या भोंगा वादावरही त्यांनी भाष्य केले. 

खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल हे पहा, अशी चर्चा बैठकीत झाली. ओबीसी आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीची भूमिका होती असे सांगतानाच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील असेही स्पष्ट करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी आवश्यक ती खबरदारी व काळजी घेण्याची गृहमंत्र्यांनी व्यवस्था केली होती. त्यामुळे, शांतता राखणाऱ्या राज्यातील जनता आणि शांतता राखण्यास तैनात असलेल्या पोलिसांचे आपण आभार मानतो, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी करताना पुढील 2 आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी निवडणुकांच्या तयारीला लागली आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारजितेंद्र आव्हाडनिवडणूक