Join us  

पवारांनी 'पगडी'वाल्याला जवळ बोलावताच सभागृहात टाळ्या-शिट्ट्यांची दाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 10:15 AM

मुंबई - साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी, पवारांनी उदयनराजेंना ...

मुंबई - साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी, पवारांनी उदयनराजेंना चांगलेच चिमटे काढले. शेजारील पगडीधारक व्यक्तीला जवळ बोलवत त्यांनी पगडी तपासून पाहिली. त्यानंतर, ''मी यांना विचारत होतो, गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये कोणतरी कुणाला तरी पगडी घालत होतं. तुम्हाला पण त्यांनीच पगडी घातली का?'' पवारांनी व्यासपीठावरील पगडीवाल्याला जवळ बोलावून उदयनराजेंना टोला मारला. पवारांच्या या टोल्यानंतर सभागृहातील सातरकरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून पवारांना दाद दिली. 

साताऱ्यातील या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. तसेच, साताऱ्यातील कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती. साताऱ्यातही शरद पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. साताऱ्यातील तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवारांनीही भाषणात उदयनराजेंचा समाचार घेतला. ‘दिल्ली भेटीवेळी स्वाभिमानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून मोघलांच्या दरबारातून बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता दिल्ली दरबारात मुजरा घालत आहेत. 15 वर्षे सत्तेत असताना यांनी काय केलं?’ असा सवाल करत ‘तुमचं हे वागणं बरं नव्हं,’ अशा शब्दांत पवार यांनी साताऱ्याच्या राजघराण्यावर निशाणा साधला. दिल्ली दरबारात लाचारी पत्करणाऱ्यांना जनताच आता जागा दाखवेल, असेही पवार म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कवड्यांची माळ आणि पगडी घातली होती. त्यानंतर दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पगडी घातली होती. शरद पवार यांच्या भाषणाच्या प्रारंभी तुतारीवादकानेही एक पगडी परिधान केली होती. भाषणाला सुरुवात करताना शरद पवार यांनी त्याला, ‘तुलापण त्यांनी पगडी घातली का?’ असा मिश्कील सवाल केला. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. पवारांनी पगडीवाल्यावरून उदयनराजेंना नाव न घेता खोचक टोला लगावला.

मी शरद पवार... आम्ही साहेबांसोबतच..!राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ग्रामीण भागातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मी शरद पवार.. आम्ही साहेबांसोबत असे लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या गीतावर थिरकले कार्यकर्तेराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आगमन कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे गीत ध्वनिक्षेपकावर लावण्यात आले. या गाण्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला आणि उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.

विरोधकांकडून पैसे घ्या आणि...!निवडणुका आल्या की आपल्याला जेवण आणि पैशांचे आमिष दाखवलं जातं. तुम्हाला कोणी पैसे दिले तर ते घ्या आणि ते आपल्या उमेदवाराला द्या, असा सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आपल्या भाषणात संजीवराजे यांनी ‘मी मेळाव्याला आलो आहे, म्हणजे समजून घ्या,’ असे सूचक विधान केले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईसातारा परिसरउदयनराजे भोसले