Join us

शरद पवारांना पाहून तो बॅगा विसरूनच विमानतळाबाहेर आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:27 IST

शरद पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह न आवरल्याने लातूरच्या तरुणाने आपल्या जवळील सामानाकडेही दुर्लक्ष केले.

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांची क्रेझ तरुणाईमध्ये नेहमीच दिसते. विशेषत: ग्रामीण भागातील तरुणाई पवार यांच्या राजकारणाची मोठी फॅन आहे. त्यामुळे अनेकदा युवक त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष ठेऊन असतात. लातूर विमानतळावरही असाच एक किस्सा घडला. शरद पवारांसोबत चालत चालत एक लातूरकर तरुण पवारांना पाहत त्यांच्या फौजफाट्यासमवेत पुढे गेला. पण, पवारांच्या या प्रेमात तो आपले सामानच एअरपोर्टवरील सिटींग रुममध्ये विसरला.   

शरद पवार यांना जवळून पाहण्याचा मोह न आवरल्याने लातूरच्या या तरुणाने आपल्या जवळील सामानाकडेही दुर्लक्ष केले. लातूरच्या या युवकाने पवारांसोबत फिरण्याचा आनंद लुटला. मात्र, या नादात तो आपले सामान विसरुन गेला. शेवटी, आपल्या सामानाची आठवण झाल्यानंतर तो सिटींग रुमकडे सामान घेण्यासाठी गेला, पण तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यास अडवले. त्यामुळे तो तरुण हताश झाला होता. त्यावेळी, त्याने शरद पवारांकडे पाहिले अन् पवारांनी हात उंचावून सुरक्षा रक्षकाला खुणावले. सुरक्षा रक्षकानेही पवारांचा इशारा लक्षात घेऊन त्या तरुणाला सिटींग रुममध्ये सामान घेण्यासाठी पुन्हा आतमध्ये जाऊ दिले. 

तरुणाची फेसबुक पोष्ट ( अनुवादित) विमानातून उतरल्यापासून एअरपोर्टच्या बाहेर पडेपर्यंत शरद पवारांसारख्या मोठ्या माणसासोबत चालण्याचा अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखा आहे. मी उत्साहाच्या भरात त्यांच्यासोबत चालत राहिलो आणि माझ्या लक्षात आले की मी माझे सामान आतमध्येच विसरलो आहे. मी सामान घेण्यासाठी पुन्हा माघारी वळलो पण सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मला मनाई केली. एवढ्यात शरद पवारांनी हात उंचावला आणि तो जे काही आतमध्ये विसरला आहे ते त्याला द्या असे त्यांनी सांगितले. तो माझ्यासोबत इथपर्यंत बोलत आला आणि त्यामुळे त्याचे सामान आतमध्येच विसरुन राहिल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या आदेशानंतर काही वेळातच एक अधिकारी माझे विसरलेले सामान घेऊन आमच्याकडे धावत आला. शरद पवार हे इतके मोठे नेते असूनही त्यांचे जमिनीवर पाय आहेत हे मी आज अनुभवले. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी त्यांना लगेच समजतात.

टॅग्स :शरद पवारलातूरफेसबुक