प्रासंगिक: स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारी 'शांताराम' नावाची चाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:42 IST2025-03-10T11:42:09+5:302025-03-10T11:42:26+5:30
विनय उपासनी मुख्य उपसंपादक जगातील महत्त्वाचे शहर, भारताची आर्थिक राजधानी वगैरे कितीही बिरुदावल्या मुंबई महानगरासमोर लावल्या, आकाशाला भेदू पाहणाऱ्या ...

प्रासंगिक: स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारी 'शांताराम' नावाची चाळ
विनय उपासनी
मुख्य उपसंपादक
जगातील महत्त्वाचे शहर, भारताची आर्थिक राजधानी वगैरे कितीही बिरुदावल्या मुंबई महानगरासमोर लावल्या, आकाशाला भेदू पाहणाऱ्या कितीही उत्तुंग इमारती या शहरात उभारल्या, मोनो-मेट्रोचे कितीही जाळे विणले तरी 'चाळ' ही मुंबईच्या जनजीवनाची मूळ ओळख पुसून टाकणे कोणालाही शक्य होणार नाही. आजही कित्येक जुन्या चाळी या महानगराच्या अवाढव्य पोटात कुठे ना कुठे तरी सुखेनैव नांदत आहेत. गगनचुंबी टॉवरांच्या भाऊगर्दीत आपली ओळख टिकवून आहेत. या चाळींना आपापला म्हणून एक इतिहास आहे. प्रत्येक चाळ -भले त्या चाळीतल्या लोकांचा तोंडवळा बदलला असेल आपली एक कहाणी सांगत असते. त्यातलीच एक म्हणजे शांताराम चाळ...
मुंबईची खरी जडणघडण झाली ती ब्रिटिश अमदानीत. समुद्रात भराव टाकून मुंबईच्या सात बेटांना जोडले ब्रिटिशांनी. मुंबई बंदरातून लंडनला भारतीय मसाले आणि कापडाची निर्यात करण्याचा व्यापार ब्रिटिशांनीच उद्यास आणला. या सर्व घडामोडींमध्ये मुंबईतील लोकवस्ती कमी पडत होती. त्यासाठी बराकींसारख्या छोट्या छोट्या खोल्या असलेल्या चाळींची निर्मिती ब्रिटिशांनी सुरू केली. त्यात एतद्देशियांच्या वस्त्या वाढू लागल्या. अठरापगड जाती-धर्माचे लोक या बैठ्या चाळींमधून राहू लागले. या लोकांनी येताना आपापल्या चालीरीती, संस्कृती, बोलीभाषा वगैरे सर्व आणले होते. त्याचे आदानप्रदान होऊ लागले आणि एक बहुभाषी, बहुढंगी मुंबापुरी उदयाला येऊ लागली. औद्योगिक क्रांतीनंतर मुंबईचा व्यापारउदीम अधिक जोमाने वाढू लागला.
एकीकडे मुंबईची ही जडघडण होत असताना देशभरात ब्रिटिशांविरोधातील चळवळ आकार घेत होती. भारतीय स्वातंत्र्याचा लढा जोर धरू लागला होता. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये त्यात आघाडीवर होती. महाराष्ट्रात अर्थातच मुंबई हे चळवळीचे मुख्य केंद्र होते. गिरगावातील शांताराम चाळ ही या चळवळीचा केंद्रबिंदू होती. ब्रिटिशांविरोधातील ३५ हून अधिक सभा शांताराम चाळीच्या प्रांगणात झाल्या. लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना यांना ब्रिटिशांविरोधात बोलण्यासाठी आणि जनजागृतीसाठी शांताराम चाळ हे हक्काचे व्यासपीठ ठरले होते. ब्रिटिशांविरोधात जनमत एक व्हावे यासाठी गणेशोत्सव, शिवजयंती, स्वदेशीचा पुरस्कार, असहकार चळवळ आदी उपक्रमांवर याठिकाणी भर देण्यात आला. यातूनच जनजागृती होत होती. त्यानिमित्ताने शांताराम चाळ कायमच चर्चेत होती. या चाळीचा हा १३५ हून अधिक वर्षांचा इतिहास सोशल मीडियाच्या जंजाळात अडकलेल्या आजच्या पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या चाळीची स्मरणगाथा पुस्तकरूपात भेटीला आली आहे.
शांताराम नाव पडले कसे?
प्रख्यात सॉलिसिटर जनरल भालचंद्र सुखटणकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव या चाळीला दिले. दहा दुमजली इमारती या चाळीच्या आवारात आहेत. १९१६ मध्ये ही चाळ होमरूल लीग चळवळीचे मुख्य केंद्र होती. त्यानंतर १९१८ मध्ये महात्मा गांधीजींनी या चाळीच्या प्रांगणात मोठी सभा घेतली. त्याला १२ हजार लोक जमले होते.