Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी भाषेवर कोणाचे प्रेम असेल, तर त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मराठीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कोणी कटिबद्ध होत असेल, तर यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, मराठी भाषेसाठी कुणी कानशिलात लगावायला लागले, तर त्या भाषेचे यश वाढेल का? केवळ महाराष्ट्रात राहणारे लोकच मराठीवर प्रेम करतात, असे आपल्याला वाटते का, संपूर्ण देश मराठीवर प्रेम करतो, असे प्रतिपादन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. चातुर्मासाची सुरुवात झाली असून, शंकराचार्य मुंबईत आहेत.
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
मराठी भाषिक लोक देशभरात जाऊन कार्य करत आहेत. देशाबाहेरही अनेक ठिकाणी मराठी शिकवली जाते. प्रत्येकाला एकापेक्षा जास्त भाषा येतीलच असे नाही. प्रत्येक जण बहुभाषिक असेल असे नाही. देशात केवळ एकच भाषा येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांना मराठी आली पाहिजे किंवा सगळ्यांनी मराठी शिकली पाहिजे, असा आग्रह तुम्ही कसा काय धरू शकता, अशी विचारणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.
ठाकरे मगधमधून आले होते, महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले
आज जे लोक मराठीचा आग्रह धरत आहेत, त्यांचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यांच्याच पूर्वजांनी आपले चरित्र लिहिले आहे, आपल्या कुटुंबाचा इतिहास लिहिला आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. ठाकरे मगधमधून आले होते. तेव्हा तेही मराठी नव्हते. त्यांनाही मराठी येत नव्हती. तेव्हा महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. मगध येथून आलेल्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्यांना मोठे मराठी भाषिक केले आणि तेच आता मराठीसाठी लढा देत आहेत. मगध येथील मागधी भाषा विसरले आणि मराठी स्मरणात राहिली. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या पूर्वजांना प्रेम दिले. ते आपण पुढे का नेत नाहीत. लोकांना एवढे प्रेम द्या की, ते त्यांची भाषा विसरून मराठी स्वीकारतील. हा मार्ग तुम्ही का स्वीकारत नाही, असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.
दरम्यान, आम्हाला ठाकरे बंधूंच्या मराठी प्रेमावर आक्षेप नाही. तुम्हाला मराठीबाबत प्रेम असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येकाला आपली संस्कृती, परंपरा, भाषा यावर प्रेम असलेच पाहिजे. आता आम्ही दोन महिने इथे असणार आहोत. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी मला मराठी शिकवावी. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेन. दोन महिन्यानंतर मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईन, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूजशी बोलत होते.