कुणाची अर्धा, कुणाची एकर जाणार..., सरकार शेतकऱ्यांना करणार बेरोजगार

By पोपट केशव पवार | Updated: March 12, 2025 14:55 IST2025-03-12T14:54:45+5:302025-03-12T14:55:17+5:30

शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात पहाटेच धडक मारली. 

shaktipeeth highway the government will make farmers unemployed | कुणाची अर्धा, कुणाची एकर जाणार..., सरकार शेतकऱ्यांना करणार बेरोजगार

कुणाची अर्धा, कुणाची एकर जाणार..., सरकार शेतकऱ्यांना करणार बेरोजगार

मुंबई : कुणाची अर्धा, कुणाची एकरभर जमीन,त्यातही तीन तीन वाटेकरी...आता कुठे पाणी आलं होतं तोपर्यंत सरकारची नजर पडली अन उभं वावर हिसकावून घेऊ लागलेत. वाडवडिलांनी कितीही संकटे आली तरी या काळ्याभोर आईचा तुकडाही  विकला नाही, आता मात्र सरकारच आमचं काळीज काढून घेतंय असा आक्रोश करत बुधवारी शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात पहाटेच धडक मारली. 

जिच्यावर रोजचं पोट भरतय ती जमीनच गेली तर जगायचं कसं या विवंचनेने  बायका पोरांच्या डोळ्याला डोळा लागत नाही म्हणत उमरी (ता. अर्धपुर जि नांदेड)येथील शेतकरी माधव भिसे या शेतकऱ्याने आसवे गाळली. 

खोबराजी एकनाथ मूधळ हा तरुण शेतकरीही याच गावचा. दोन चुलत्यांसह नऊ एकर जमीन.  एलदरी धरण प्रकल्पामुळे पहिल्यांदा केळी रानात पिकल्याचा आनंद त्याच्यासाहित कुटुंबाला झाला होता; मात्र, यातील तब्बल सात एकर जमीन महामार्गात जात असल्याने उभ्या कुटुंबाचे हातपाय गळाले आहेत. आवाज उठवला तर ही जमीन वाचेल म्हणून चुलत्यांसह पहाटेच मुंबईत आल्याचे खोबराजीने सांगितले. २०-२१ वर्षाच्या तरण्याबंड पोरापासून ७०-७५ वर्षाच्या वयोवृद्धपर्यंतचे शेतकरी या मोर्चात मोठया आशेने सहभागी झाले होते. 

सगळीच शेती गेली आता जगायचं कसं..? 

दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतकरी जिनगौडा पाटील यांना भावांसहित तीन एकर जमीन. या महामार्गात विहिरीसह पूर्ण तीन एकर जमीन जात असल्याने पूर्ण पाटील कुटुंब हतबल झाले आहे. आता सांगायला नव्हे राहायलाही घर राहत नाही म्हणत ते  अस्वस्थ झाले. 

कोल्हापूर जिल्यातील सत्ताधारी  लोकप्रतिनिधीनी  आधी हा महामार्ग करणार नाही म्हणून सांगितले. निवडणूक झाल्यानंतर मात्र लगेच भूमिका बदलली. ही फसवणूक पाठीत वार करणारी आहे.

 शंभूराजे देसाई, शेनोळी(ता. भुदरगड) 

आम्हा दोन भावांची तीन एकर जमीन. त्यातील एक एकर जमीन महामार्गात जात आहे. पिकवू जमीन घेऊन रस्ता करणे चुकीचे आहे. 

महादेव उबाळे (सिद्धनेर्ली ता. कागल) 

माझ्या ६० गुंठे जमिनीपैकी ३० गुंठे जमीन सरकार बळकावत आहे. एकतरसरकार  पाणी देत नाही, महागाई करून ठेवली आहे.आम्ही कसंतरी जगतोय, तेही सरकारला बघवत नाही.

ज्ञानेश्वर पडोळे, पळसगाव(वसमत, जि. हिंगोली)

एकाच भावकीतील सात विहिरी महामार्गात गडप होणार..

 व्हान्नूर (ता. कागल)येथील सुरेश सपकाळ यांची पाऊण एकर जमीन महामार्गात जात आहे. त्यांच्या ४२ फूट विहरीसह त्यांच्या भावकितील सात विहिरी या महामार्गात गडप होणार आहेत.जर न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरेबांधणार  असल्याचा इशारा दिला. 

बहिणींना पैसे नको, बहिणीची जमीन काढून घेऊ नका

निमशिरगाव(ता. शिरोळ) येथील तिथी शिवाजीराव कांबळे यांची पिकाऊ सगळीच जमीन महामार्गात जात असल्याने आपल्या मुलांचे काय होणार या चिंतेने त्यांच्या डोळ्याच्या कडा ओळवल्या. लाडक्या बहिणींना ओवाळणी देऊ नका, पण बहिणींची जमीन काढून घेऊ नका अशी आर्त हाक तिथी कांबळे यांनी दिली.

तर मंत्र्यांना गावात येऊ देणार नाही
 
जर शक्तीपीठ महामार्गला लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी समर्थन दिले तर मंत्र्यांना गावात फिरकू देऊ नका असा इशारा युवराज गवळी यांनी दिला. 

मुंबईतील कोल्हापूरकरही मोर्चात

आपली गावाकडची जमीन महामार्गात जात असल्याने आजरा, भुदरगड, कागल या तालुक्यातील मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांनी या मोर्चात हजेरी लावली. 

मोर्चात शाहिरी 

कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी आता काय मागे सरायचं न्हाय ही शाहिरी सादर करत मोर्चात स्फूर्ती चेतावली. त्याला शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

महिलांचाही उपस्थिती

या मोर्चात १२ जिल्ह्यातील महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व भुदरगड तालुक्यातील महिलांची संख्या अधिक होती. 

रात्रभर प्रवास करूनही १२ जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वतःची पदरमोड करून यवतमाळपासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडपर्यंतचे शेतकरी या मोर्चात फलक हातात घेऊन आझाद मैदानावर उपस्थित होते.

मोर्चात लोकमतची चर्चा

शक्तीपीठ महामार्गाबाबतीत लोकमतने सुरुवातीपासून घेतलेल्या भूमिकेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर लोकमतने  चार भागाच्या मालिकेद्वारे शक्तीपीठ महामार्गाची चिरफाड केली आहे. या मालिकेमुळे नेमके किती पूल होणार, किती जमिन जाणार, पर्यावरणाची हानी यांचा सांगोपांग आढावा घेण्यात आल्याने शेतकऱ्यांनी लोकमतचे कौतुक केले. ज्यावेळी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे अशा काळात लोकमतसारखे दैनिक शेतकऱ्यांची बाजू मांडत असल्याने आम्हाला दहा हत्तीचे बळ आल्याची भावना महादेव उबाळे या शेतकऱ्याने व्यक्त केली.                    

आंदोलनाला धार...

शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे अत्यंत सखोलपणे लोकमतने वृत्तांकन केले. या मालिकेची चर्चा मोर्चा स्थळी शेतकरी करत होते. लोकमतमुळेच शेतकऱ्यांत  प्रबोधन होऊन आंदोलनाला धार आल्याचे अनेकांनी आवर्जून सांगितले.

Web Title: shaktipeeth highway the government will make farmers unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.