लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूर्ण भरपाई मिळणे कदाचित शक्य नाही. परंतु, योग्य भरपाई मिळणे, हा नियम असला पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमधील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबाला देण्यात आलेली ६२ लाख रुपये भरपाईची रक्कम उच्च न्यायालयाने कायम ठेवली.
मोटार वाहन कायदा हा महत्त्वाचा कायदा आहे आणि न्यायालय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत सन्मानाने निरोगी जीवन जगण्याशी संबंधित हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पैसा झालेली जीवितहानी भरून देऊ शकत नाही. मात्र, त्या व्यक्तीच्या जाण्याने झालेल्या नुकसानाची भरपाई पैशाने भरून काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देत स्पष्ट केले.
न्यायाच्या उद्देशाने किमान जे काही करता येईल, ते म्हणजे शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटचे ॲनिमेटर चारू खंडाल यांच्या कुटुंबाला ६२ लाख रुपयांची भरपाई मंजूर करणे, ही एका तरुण, महत्त्वाकांक्षी, व्यावसायिक महिलेची ‘हृदयद्रावक आणि दु:खद कहाणी’ आहे, असेही न्यायालयाने म्हटले. मार्च २०१२ मध्ये ओशिवरा येथे एका वेगवान कारने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर २८ वर्षीय चारुला अर्धांगवायू झाला आणि पाच वर्षांनी तिचे निधन झाले. शाहरुख खानच्या ‘रा-वन’ चित्रपटाच्या व्हीएफक्सवर ती काम करत होती.
मोटार अपघात दावा लवादाचा निर्णय कायम
‘रा-वन’ चित्रपटासाठी तिच्या टीमला पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका पार्टीतून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर चारूच्या पालकांनी २०१४ मध्ये मोटार अपघात दावा लवादाने भरपाईसाठी दावा दाखल केला आणि लवादाने नोव्हेंबर २०२० मध्ये चोला मंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीला ६२ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला.
कंपनीने उच्च न्यायालयाने याचिका करत या निर्णयाला आव्हान दिले होते. कंपनीने अपीलात असा दावा केला की, महिलेचा मृत्यू आणि अपघातात तिला झालेल्या दुखापतींमध्ये कोणताही संबंध नाही. अपघातानंतर चार वर्षांहून अधिक काळानंतर चारूचा मृत्यू झाला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला.